नेर (यवतमाळ) : चालू हंगामात दुबार पेरणी, परतीचा अती पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बाेंडअळी, बनावट बियाणे यासोबतच अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले आहे. पण सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. यामुळे शुक्रवारी युवा शेतकरी संघर्ष वाहिनीच्यावतीने येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. आधीच दुबार पेरणीचे संकट. त्यात जास्त पावसाने मूग, उडीद, कापूस, साेयाबीनचे आणि परतीच्या पावसाने सोयाबीन व कापसाचे नुकसान झाले. बोंडअळीचे संकट मोठ्या प्रमाणात आहे.
संकटाची ही मालिका सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी पीक पाहणी केली नाही. याउलट आणेवारी ५४ टक्केच्यावर दाखवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले. या सर्व बाबींचा निषेध म्हणून तहसील कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आक्रोश करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, आणेवारीचे योग्य ते आकडे जाहीर करून पीकविमा देण्यात यावा, बोगस बियाण्यांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष अरसोड, सुनील खाडे, गोपाल चव्हाण, गाैरव नाईकर, मिलन राठोड, सतीश चवाक, पंकज खानझोडे, कपिल देशमुख, सचिन भाकरे, मिथून मोंढे आदी उपस्थित होते.