लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जानेवारीची गार उल्हसित सकाळ. त्यात सडासंमार्जन करून रांगोळ्यांनी नटलेले रस्ते. त्यावर मराठीचे गुणगान करीत पडणारी प्रतिभावंत पावलं... हे दृश्य होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे. यवतमाळात संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी निघालेल्या ग्रंथदिंडीत संतांची वेशभूषा केलेले निरागस चिमुकले, पारंपरिक वेशभूषेत सादर केलेले लोकनृत्य अन् आसमंतात गुंजणारे ‘गर्जा महाराष्ट्र’ गीत, असा सुखद तेवढाच प्रेरक सोहळा झाला.जवळपास एक किलोमीटर लांब असलेली ही ग्रंथदिंडी सकाळी आठ वाजता आझाद मैदानातून निघाली. ग्रंथदिंडीच्या सर्वात पुढे होते संत गाडगेबाबा. त्यांची वेशभूषा केलेल्या साहित्य रसिकाने इतर रसिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. या स्वच्छतादूताच्या मागे असलेल्या दिंडीत घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या घोड्यावर राजमाता मॉ जिजाऊ. जणू अवघ्या मराठी जणांचे ते नेतृत्व करीत होते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत नरसी मेहता, संत जलाराम बाप्पा, संत गजानन, संत जगनाडे महाराज यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. तर याच संतांची वचने नागरिकांना जीवनमूल्ये शिकवून गेली.तर दुसरीकडे पारंपरिक बंजारा वेश परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी लेंगी नृत्याचा फेर धरला होता. त्यापाठोपाठ कोलामी नृत्य. लगेच डफड्याच्या तालावर सुरू असलेले दंढार नृत्य जिल्ह्याची लोकसंस्कृती महाराष्ट्राच्या पटलावर आणत होते. प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी फासेपारधी समाजाच्या व्यथा मांडणारा देखावा साकारला होता. केवळ या समाजात जन्माला आलो म्हणून आम्हाला गुन्हेगार ठरवू नका, असा आक्रोश त्यांनी आपल्या फलकातून व्यक्त केला. तर याच दिंडीत महानुभाव पंथीयांनी ‘मराठी विद्यापीठ’ रिद्धपुरात स्थापन करा, मातंग विहिरीला स्मारकाचा दर्जा द्या आदी मागण्यांना वाचा फोडली. विद्यार्थ्यांच्या लेझीमनृत्याने दिंडीला वेगळी रंगत आणली. दिंडीतील लुगडे, फेटे परिधान केलेल्या अनेक महिलांनी फुगडीचा फेर धरला होता.पाच कंदिल चौक, तहसील चौक, गोधनी रोड, राजन्ना बिल्डींग, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बसस्थानक चौक, गार्डन रोड, एलआयसी चौक अशा मार्गाने फिरत ही ग्रंथदिंडी संमेलनस्थळी पोहोचली. दिंडीच्या मार्गावर अनेक गृहिणींनी, काही व्यावसायिकांनी रस्ते स्वच्छ करून रांगोळी काढल्या होत्या. चौका-चौकात दिंडीच्या स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दिंडी संमेलनस्थळी पोहोचल्यावर नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते साहित्य महामंडळाचे ध्वजारोहण करण्यात आले.या ग्रंथदिंडीमध्ये संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक वैशाली सुधाकर येडे, स्वागताध्यक्ष पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नगराध्यक्ष कांचन चौधरी, संमेलन कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, कोषाध्यक्ष विलास देशपांडे, कार्यवाह इंद्रजित ओरके, कौतिकराव ठाले पाटील, प्रकाश वायगुडे, उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, सुधाकर भाले, अनुपमा अजगरे, कार्यवाह प्रा. घन:शाम दरणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, महिला समितीच्या प्रमुख विद्या खडसे, प्रवीण देशमुख, नानाभाऊ गाडबैले, दिनेश गोगरकर, जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदिनी दरणे, नगरपरिषद बांधकाम सभापती विजय खडसे यांच्यासह महाराष्ट्रभरातील साहित्यिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी होते.‘पुलं’, ‘गदिमां’चा जागरपु. लं. देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून ग्रंथदिंडीमध्ये त्यांच्या साहित्यावर आधारित देखणे देखावे साकारण्यात आले होते. गदिमांच्या ‘गीतरामायणा’चे सूर उमट होते... स्वये श्रीराम प्रभू ऐकती! त्यासोबतच विद्यार्थ्यांनी रामायण कथन करीत असलेले लव-कुश साकारले होते. दुसºया देखाव्यात पु. लं. देशपांडेंच्या रचना चितारण्यात आल्या होत्या. ‘पु. लं. एक कल्पवृक्ष’ या चित्रासोबतच स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी ‘पुलं’च्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील प्रसंग लिहिलेले फलक उभारले होते. या साहित्यिकांसोबतच यवतमाळचा गौरव असलेले य. खु. देशपांडे, भाऊसाहेब पाटणकर, कवी शंकर बडे यांच्या रचनांचा देखावाही लक्षवेधी होता.
अ.भा. मराठी साहित्य संमेलन; ग्रंथदिंडी दुमदुमली... साहित्याची पहाट अवतरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:53 PM
जानेवारीची गार उल्हसित सकाळ. त्यात सडासंमार्जन करून रांगोळ्यांनी नटलेले रस्ते. त्यावर मराठीचे गुणगान करीत पडणारी प्रतिभावंत पावलं... हे दृश्य होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे.
ठळक मुद्देनिर्लेप बालकांनी साकारले संत लेंगीनृत्य, दंढारनृत्याने वाढविली रंगत