लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यातील जंगलात एकाच दिवशी सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी चक्क १० वाघ भटकंती करताना पहायला मिळाले. सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेऱ्यात कैद केले. हा दुर्मिळ प्रकार बुधवारी घडला.टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन सतत होत असल्याने मागील काही दिवसात पर्यटकांचा ओढाही या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच बुधवारी सकाळी जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसात वाळलेल्या गवतातून एक दोन नव्हे तर चक्क दहा वाघांचे दर्शन झाले. यामध्ये आर्ची वाघिणीसोबत तिचे तीन बछडे, तलाववाली वाघिणीसोबत तिचे चार बछडे व एक पिलखानवाली वाघीण असे चक्क १० वाघ पर्यटकांना दिसून आले. यावेळी काही पर्यटकांनी त्यांचे फोटोसुद्धा काढले असून काही फोटो सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल होत असल्याचे सांगितले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाघ दिसत असल्याने आता तरी शासनाने टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जाची मागणी होत आहे.
२२ वाघांचे अस्तित्व- टिपेश्वर अभयारण्य १४८.६३ चौरस किलोमीटर विखुरलेले असून, या अभयारण्यात बिबट, अस्वल, रानगवा यासह विविध वन्यप्राणी आहेत. तसेच विविध प्रकारचे पक्षी आहेत. तज्ज्ञांच्या मते किमान २२ वाघांचे अस्तित्व टिपेश्वर अभयारण्यात आहे. हमखास वाघाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने अनेक पर्यटक सुट्टी घालविण्यासाठी या अभयारण्यात येतात.