सिंचन घोटाळ्यासाठी ‘एसीबी’चे स्वतंत्र पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:01 AM2019-01-10T00:01:33+5:302019-01-10T00:05:28+5:30
सिंचन घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती व नागपूर विभागासाठी दोन स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सिंचन घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती व नागपूर विभागासाठी दोन स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रत्येकी दहा सहायक पोलीस निरीक्षक व एक पोलीस निरीक्षक राहणार आहे. त्यासाठी एसीबीच्या महासंचालकांकडून पोलीस विभागातील अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहे.
विदर्भातील काही सिंचन प्रकल्पांच्या कामांत पात्रता नसलेल्या कंत्राटदारांना कामे देण्यासाठी खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचा ठपका आहे. अनेकांना चुकीच्या पद्धतीने अग्रीम देण्यात आला आहे. यामध्ये सिंचन महामंडळ व पाटबंधारे विभागातील अधिकारीही गुरफटले असण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने गंभीर दखल घेतली. एसीबीच्या कारभारावर न्यायालयाने ताशेरे ओढत त्वरित सिंचन अपहाराचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे राज्य शासन कामाला लागले. अमरावती विभागातील प्रकल्पांच्या कामाची चौकशी करण्यासाठी दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस निरीक्षक यांचे पथक तयार केले जात आहे. याच पद्धतीने नागपूर विभागातही स्वतंत्र पथक सिंचन घोटाळ्यासंबंधित कागदपत्रांची पडताळणी करणार आहे. याकरिता पोलीस दलातील कार्यरत अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रतिनियुक्तीवर घेतले आहे.
जिल्ह्यातील पाच प्रकल्पांची चौकशी
एसीबीकडून जिल्ह्यातील बेंबळा, झरी तालुक्यातील पाचपोर, दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा आणि नेर तालुक्यातील प्रकल्पांच्या कामाची चौकशी केली जात आहे. यामध्ये सिंचन विभागातील निविदा प्रक्रियेपासून तर कंत्राटदाराला दिलेल्या देयकापर्यंत सर्वच कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर सिंचन विभागातील संबंधित जबाबदार अधिकाºयांचे बयाण नोंदवून दोषारोप निश्चित केले जाणार आहे.
यवतमाळातून तीन अधिकारी
एसीबीच्या अमरावती विभागाच्या चौकशी पथकात यवतमाळातील पोलीस निरीक्षक संजय डहाके, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत व मनोज लांडगे यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेशही संबंधितांना मिळाले आहेत.