दारव्हा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका कोरोना संनियंत्रण समितीची बैठक घेऊन उपस्थितांना सूचना दिल्या. त्यानंतर शहरातील दोन कंटेन्मेंट झोनची पाहणी केली.
शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी येथील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये धडकले. त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली. नंतर टीएचओ कार्यालयात कोरोना संनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा घेतला. कोरोनाच्या चाचण्या वाढवा, लसीकरणाला गती द्या, यासह अनेक सूचना दिल्या.
तालुक्यातील एखाद्या ठिकाणी ज्यादिवशी कोविडचा रुग्ण निघाला, त्याच दिवशी तेथे कंटेन्मेंट झोन तयार करा. त्याच झोनमध्ये त्वरित तपासणी सुरू करा. काही अडचण आल्यास सोबत पोलिसांना ठेवा, तसेच इतर बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, मुख्याधिकारी धीरज गोहाड, ठाणेदार यशवंत बावीस्कर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय मांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खांदवे व संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन कंटेन्मेंट झोनला भेट दिली.
बॉक्स
४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे
तालुक्यातील सात केंद्रांवर कोरोना लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत साडेपाच हजार नागरिकांनी लस घेतली. आता ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करून घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन एसडीओ जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव यांनी केले आहे. तालुक्यातील तळेगाव, सायखेडा, बोरी, मांगकिन्ही आदी चार पीएचसीमध्ये आणि येथील ट्रामा सेंटर, तर लोही व धामणगाव येथील उपकेंद्र, अशा सात केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर किमान २०० नागरिकांनी लसीकरण करून घेणे अपेक्षित आहे.