लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा ते अकोला या मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला गुरुवारी सकाळी ११ वाजता घाटंजी ते कोळंबी दरम्यान अपघात झाला. रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये ही बस उतरली. सुदैवाने कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.एमएच-४०वाय-५७८३ क्रमांकाची ही बस यवतमाळवरून घाटंजीकडे जात असताना कोळंबी गावाच्या पुढे चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्याकडेला खड्ड्यात उतरली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. काही प्रवाशांंना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यात मुंबई येथील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे ११६३ कोटी रुपये बजेट असलेली पाच रस्त्यांची कामे देण्यात आली आहे. त्यात कोळंबी-वडगाव जंगल-पांढरकवडा या मागार्चेही काम आहे. ईगल कन्स्ट्रक्शनचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. सर्व पाचही रस्त्यावर या कंत्राटदाराने रस्त्याच्या दुतर्फा जेसीबीने केवळ खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला असून एकावेळी दोन वाहने पास करताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतुकीस खोळंबा निर्माण होत असून अपघातही वाढले आहे. गुरुवारी सकाळी एसटीला झालेला अपघात ईगल कन्स्ट्रक्शनच्या याच संथ कारभाराचा परिणाम मानला जातो. येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रदीप राऊत यांनी ईगल कन्स्ट्रक्शनच्या या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यानंतरही या कामाची गती वाढलेली नसल्याची खत प्रा. प्रदीप राऊत यांनी लोकमतकडे व्यक्त केली.
यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा-अकोला एसटी बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 1:26 PM
पांढरकवडा ते अकोला या मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला गुरुवारी सकाळी ११ वाजता घाटंजी ते कोळंबी दरम्यान अपघात झाला.
ठळक मुद्दे रस्ता रुंदीकरणाच्या कारभाराचा फटका