लाडखेड (यवतमाळ) : जिल्ह्यातील सर्वच रेती घाटांवर यंत्रणेच्या मूक संमतीने रेतीचा उपसा सुरू आहे. राजरोसपणे रेतीची चोरी केली जात आहे. दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे रेती घाटावर दिवसाला ५० वाहने रेतीचा उपसा करीत असतात. याच स्पर्धेतून भरधाव ट्रॅक्टरला सोमवारी सकाळी ९ वाजता आमसेत फाट्यावर अपघात झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.
बाळू धनराज राठोड (४०, रा. वडगाव गाढवे) असे मृताचे नाव आहे. तर पांडुरंग नृसिंह चव्हाण हा गंभीर जखमी आहे. वडगाव येथील अडाण नदी पात्रातून रेतीचा उपसा केला जात आहे. सकाळीच रेतीची खेप घेऊन जात असणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातून एकाचा बळी गेला. स्थानिक यंत्रणांनी रेती घाटावर उपसा करण्याची मूक संमती दिली आहे. त्याकरिता प्रतिवाहन महिन्याला २५ हजार रुपये हप्ता पोहोचविला जात आहे.
एकीकडे प्रशासनाने नियमावर बोट ठेवून रेती घाटाचा लिलाव थांबविला. नवीन रेती डेपो ही उघडले नाही. सर्वसामान्य नागरिक जादा दराने तस्करांकडून रेती खरेदी करण्यास मजबूर झाले आहे. हा पैसा यंत्रणेला गब्बर बनवित आहे. अपघाताच्या घटनेनंतर लाडखेड पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत मृत चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार स्वप्नील निराळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दुर्गालाल टेंबरे, शिपाई जयंत शेंडे करीत आहे.
रेती तस्कर एवढे शिरजोर का झालेत
नियमानुसार प्रशासनाकडे घर बांधण्यासाठी रेती मागणाऱ्यांना रेती मिळाली नाही. पर्यावरण विभागाचा कायदा दाखवत रिकाम्या हाताने परत पाठविले. दुसरीकडे मात्र रेती तस्कर रेती घाटातून राजरोसपणे उपसा करीत आहे. या तस्करांना एवढे अभय कुणाकडून मिळत आहे. ते शिरजोर का झालेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.