यवतमाळ : उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. हनुमंत संताराम धर्मकारे यांची ११ जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येच्यावेळी मुख्य मारेकरी एैफाज याने मृत भावाचे कपडे घातले होते. ही खळबळजनक कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.
डॉ. धर्मकारे यांची ११ जानेवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तब्बल दहा पोलीस पथके तयार केली होती. त्यांनी सर्व दिशेने आणि सर्व शक्यता पडताळून तपास केला. विविध पैलूंचा मागोवा घेत तांत्रिक बारकाईने तपास केला. ४८ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणून शेख एैफाज शेख अब्रार (२२, रा. वसंतनगर पुसद’ याने सैयद तौसिफ सैयद खलिल (३५), सैयद मुस्ताक सैयद खलिल (३२), शेख मौसिन शेख कय्यूम (३४), शेख शारूख शेख आरम (२७, सर्व रा. ढाणकी) यांच्या मदतीने खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य आरोपी शेख एैफाज शेख अब्रार हा घटनेपासून फरार होता. त्याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील धार येथून ताब्यात घेतले.
मुख्य आरोपीने त्याच्या मृत भावाचे कपडे घालूनच डॉक्टरवरगोळीबार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. दोन वर्षांपूर्वी त्याच्या भावाचा डॉ. धर्मकारे यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करून त्याने त्याच्या मृत्यूचा वचपा काढण्याच्या हेतूनेच डॉक्टरची हत्या केल्याचेही सांगितले. या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
कळमनुरीतून दुचाकी घेतली ताब्यात
आरोपीने हत्त्या केल्यानंतर पळून जाताना दुचाकी (क्र.एम.एच.२९/बी.जे.८६८२) वापरली होती. ही दुचाकी कलिम खान वजीर खान ऊर्फ बबलू (रा. पठाणवाडी, पुसद) याने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे एका धार्मिक परिसरात लपवून ठेवली होती. पोलिसांनी ही दुचाकीसुद्धा ताब्यात घेतली. मुख्य आरोपीने डॉ. धर्मकारे यांच्या हत्येसाठी ११ जानेवारीपूर्वी उमरखेडमध्ये येऊन त्यांच्यावर पाळत ठेवल्याचेही कबूल केले तसेच यापूर्वी एकदा डॉ. धर्मकारे यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन आल्याने पळून गेल्याचेही सांगितले. या गुन्ह्यात आपल्याला जावई अमजद खान सरदार खान, मामा सैयद तौसिफ सैयद खलिल, सैयद मुस्ताक सैयद खलिल व त्यांच्या मित्रांनी मदत केल्याचीही कबुली दिली.