पुसदचे प्रकरण : तीन पसार आरोपींचा शोध सुरूपुसद : खंडणीसाठी एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर तीन पसार आरोपींचा खंडाळा पोलीस शोध घेत आहे.शेख इरफान ऊर्फ तप्पू खान हारुण पठाण (२७) रा.पुसद हा खंडाळा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तर वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर पोलिसांनी अटक केलेले चार आरोपी शेख मुख्तार शेख निजाम (२७) रा.नवलबाबा वॉर्ड, पुसद, ईश्वर तुकाराम राठोड (२९) रा.सेवादासनगर व मो.समीर मो.कलिम (२६) रा.बालाजी वॉर्ड, पुसद यांना १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ११ आॅक्टोबर रोजी पुसद परिसरातील सर्व आठ आरोपींनी संजय माधव अहीरराव रा.ग्रीनपार्क, पुसद यांचे अपहरण करून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी अपहरण तर मंगरूळपीर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे. मंगरूळपीर पोलिसांनी अटक केलेले चार आरोपी लवकरच खंडाळा पोलिसांच्या ताब्यात येतील, अशी माहिती ठाणेदार भगवान वडतकर यांनी दिली. आठपैकी तीन आरोपी अद्यापही पसार असून त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)
अपहरण प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी
By admin | Published: October 15, 2015 3:02 AM