यवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीत हयगय करणे, कार्यालयीन कामकाजात हयगय करणे, मुख्यालयी हजर न राहणे यासह विविध कारणाने ग्रामसेवकाचे निलंबन, तलाठ्याची वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना धडकताच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी ‘लोकमत’ला दिली. यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राठोड गावात येत नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांपुढे आली. शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणाची तपासणी करताना अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. यामुळे ग्रामसेवक राठोड यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले होते. यासोबतच मनपूरचे ग्रामसेवक क्षीरसागर यांनी बळीराजा चेतना अभियानाची अंमलबजावणी गंभीरतेने केली नाही. या अभियानात हयगय करण्यात आल्याचा ठपका ग्रामसेवक क्षीरसागर आणि तलाठी यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे या कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यानुसार ग्रामसेवकाचे निलंबन, वेतनवाढ रोखणे अशी कारवाई करण्यात आल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गायनार यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)
कामात कुचराई करणाऱ्या ग्रामसेवक, तलाठ्यांवर कारवाई
By admin | Published: July 17, 2016 12:51 AM