महागाव : तालुक्यातील नांदगव्हाण जंगलात तोडलेले सागवान आढळून आल्यानंतर वन विभागाने जप्तीची कारवाई केली. याप्रकरणात वनपालाचे दुर्लक्ष आढळून आले असून चौकशीअंती त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे महागाव वनपरिक्षेत्र अधिकारी यू.एन. पंधरे यांनी सांगितले.नांदगव्हाण जंगलातील सागवानतोड प्रकरण वनविभागाने गांभीर्याने घेतले आहे. संपूर्ण परिसर वनपरिक्षेत्र अधिकारी पंधरे यांनी पिंजून काढला. तोडण्यात आलेल्या सागवान मालाचे दोन पीआर फाडण्यात आले. याप्रकरणाची व्याप्ती पाहता पुसद विभागाच्या फिरत्या पथकाने तपास हाती घेतला आहे. महागाव वन विभाग आणि फिरते पथक संयुक्त तपास करणार आहे. मंगळवारपासूनच नांदगव्हाण जंगलात गस्त वाढविण्यात आल्याची माहिती पंधरे यांनी दिली. चोरट्यांच्या मागावर एक पथकही पाठविण्यात आले आहे. या सागवान टोळीत तेलंगणातील तस्करांचा हात आहे काय, याचाही शोध घेतला जात आहे. फिरत्या पथकाचे सहायक वनरक्षक धुमाळे यांनी कालपासूनच जंगलात ठिय्या दिला आहे. या सागवान प्रकरणाने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले असून संयुक्त तपासणीतून काय बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर या बीटच्या वनपालावर दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून कारवाई अपेक्षित आहे. (शहर प्रतिनिधी)
सागवान तोडप्रकरणी लवकरच कारवाई
By admin | Published: January 15, 2016 3:16 AM