लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील हातला येथील रेती घाटावर मंगळवारी दुपारी ४ चार वाजताच्या सुमारास अपर जिल्हाधिकाऱ्यांनी धाट टाकली. या धाडीत त्यांना रेतीचे दोन अवैध साठे आढळले.अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी मंगळवारी हातला येथील रेती घाटाची आकस्मिक पाहणी केली. परिसरात दोन ठिकाणी २५ ब्रास अवैध रेतीसाठा सापडला. हातला रेती घाट नेहमी चर्चेत असतो. या घाटावरून ओम सूर्यवंशी यांच्या ट्रक्टरने दिवट पिंप्री येथे अवैधरित्या रेतीसाठा जमा केला जात होता. दुबे यांनी रेतीचा वाहतूक परवाना विचारला असता, चालकाकडे परवाना आढळला नाही. दिवट प्रिंपीच्या कडेला असलेल्या गोधावळे यांच्या खुल्या जागेत हा रेतीसाठा जमा केला जात होता. त्याच्याकडे कुठलाही साठवणुकीची परवाना आढळला नाही. त्यामुळे तेथील १७ ब्रास रेतीसाठा जप्त करून दंडात्मक कारवाईचे आदेश दुबे यांनी दिले. नंतर त्यांनी हातला रेती घाटाला भेट दिली. घाटाच्या पाहणीत एकही वाहन आढळले नाही. घाटावर त्यांनी कॅमेरा संदर्भात विचारपूस केली. तेथून परत येताना याच परिसरात एका शेतात आठ ब्रास रेतीसाठा आढळला. त्याची चौकशी केली तो अवैध रेतीसाठा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार यांना पंचनामा करून कारवाईचे आदेश दिले. रेती घाटाला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्याची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आली. नंतर नायब तहसीलदार काशीनाथ डांगे, मंडळ अधिकारी माखने घाटावर दाखल झाले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळीच पंचनामा करून दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अमोल ढोके, दिनेश अहीरे, सुभम बागडे उपस्थित होते.