यवतमाळ : महाराष्ट्र पोलीस दलात निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये गोंधळ झाल्याने अनेक जिल्ह्यात बदलीवर गेलेेले निरीक्षक अतिरिक्त ठरले. या निरीक्षकांचे नेमके करायचे काय, याबाबत राज्यातील अनेक घटक पोलीस प्रमुखांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला मार्गदर्शन मागितले आहे. मात्र, अद्यापही हे मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक घटकात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय व विनंती बदल्या करण्यात आल्या. मात्र अधिकारी दिलेल्या घटकात रुजू होताच या बदल्यांमधील गोंधळ पुढे आला. सर्वाधिक गोंधळ विनंती बदल्यांमध्ये पहायला मिळाला. विनंती अर्ज नसणाऱ्याची बदली केली गेली. अशा अधिकाऱ्यांनी महासंचालक कार्यालयात जाऊन विचारणा केली असता तुमचा अर्ज नाही, मात्र कुण्यातरी राजकीय नेत्याच्या शिफारसीमुळे तुमची बदली केली, असे सांगितले गेले. मग ही बदली नियमानुसार प्रशासकीय यादीत का नाही, या प्रश्नावर संबंधित यंत्रणा निरुत्तर झाले.