सभेत संतप्त प्रतिक्रिया : जुन्या शाळेतच रूजू करून घेण्याची मागणी, निवेदने, तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्षयवतमाळ : ‘घर के ना घाट के’ ठरलेले खासगी शाळांचे अतिरिक्त शिक्षक आता दररोज शिक्षणाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. शुक्रवारी या शिक्षकांनी बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाहीर सभा घेऊन व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त केला. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्ह्यातील खासगी शाळेतील १९४ शिक्षकांना आॅनलाईन संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला या शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. तसा नियुक्ती आदेश घेऊन शिक्षक संबंधित शाळेत गेल्यावर तेथील मुख्याध्यापक, संस्थाचालक यांनी शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक आता अधांतरी झाले आहेत.दरम्यान आॅनलाईन संचमान्यतेच्या विरोधात सिंधुदुर्ग शिक्षण संस्थेने सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. या न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत शिक्षकांचे समायोजन करू नये, अशी भूमिका जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांनी घेतली. मात्र, प्रशासनाकडून समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने संस्थाचालक आता समायोजन प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करीत आहे. तर शिक्षक दररोज आपली ‘हजेरी’ लावण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात येऊन स्वाक्षरी करीत आहेत. दररोज निवेदने, तक्रारी देऊनही अतिरिक्त शिक्षकांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी अतिक्ति शिक्षकांनी बसस्थानक चौकातील लॉर्ड बुद्धा कार्यालयात सभा घेतली. त्यात संपूर्ण प्रक्रियेबाबत संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागणीचे निवेदन दिले. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आपल्याला जुन्या शाळेत रूजू करण्यात यावे, तसेच आपला पगार कोण काढणार हे स्पष्ट करावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. यावेळी सुभाष कुळसंगे, पुरुषोत्तम दरेकार, प्रशांत कडूकार, घनश्याम बोरकर, एम.जी.हामंद, आर.एस.चांदने, डी.पी.कुबडे, व्ही.के. राऊत, ए.आर.कांबळे, ए.पी.विरदंडे, एन.एच.सैय्यद, एस.एम.बुद्धे, प्रज्ञा आवारे, संगीता वानखडे, कविता जोशी, अर्चना पडोळे, प्रणिता महाजन, मनिषा राऊत, कविता लोंडे, एस.एस.टाके, प्रफुल्ल चांदेकर, एस.एन.पानघाटे, आर.एम.मोडक, जी.बी. ठोंबरे, व्ही. के. राऊत, पी.बी.गोलाईत, एन.यू. नंदनवार, यू.एच.गोळे, व्ही.एस.ठाकरे, आर.एन.जीवतोडे, के. पी. कैलासवार, जी.झेड.वैद्य, डी.एन.घुगे, एस.एस.आडे, एन.ओ.देशकरी, किशोर गडपायले, जी.डी. गोरटे, पी.पी.बावतेर, ए.पी.ठाकरे, व्ही.बी. बोंदरे आदी अतिरिक्त शिक्षक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अतिरिक्त शिक्षक पुन्हा धडकले ‘इओ’ कार्यालयावर
By admin | Published: September 24, 2016 2:42 AM