शिरसगाव पांढरी : नेर तालुक्यातील अडगाव (खाकी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावण्यासोबतच अनेक गैरप्रकार झाले आहेत. सदर शाळेत मागील दोन वर्षांपासून शौचालय नाही. शाळा परिसर अस्वच्छतेने बरबटलेला आहे. एवढेच नव्हे तर गैरप्रकारानेही कळस गाठलेला आहे. अस्तित्वात नसलेल्या प्रतिष्ठानांची बिले जोडून मोठ्या रकमा उचलण्यात आल्या आहेत. शालेय पोषण आहाराच्या नावाखाली मोठ्या रकमा उचलल्या गेल्या. प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला शाळेत कधीही पोहोचला नाही. नेर येथे अस्तित्वातच नसलेल्या एका भाजी विक्रेत्याच्या नावावर बिल काढण्यात आले. अमरावती येथे जे दुकान कधीही सुरूच झाले नाही, त्या दुकानाच्या नावावरही तीन हजार रुपयांची उचल करण्यात आली. एकूणच बोगस बिले सादर करून गैरप्रकार करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी चंद्रशेखर तोडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ज्या नावाने बिले सादर करण्यात आली, त्या लोकांच्या प्रत्यक्ष भेटी तोडकर यांनी घेतल्या. सदर शाळेने केलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर त्यांनी आपल्याकडून असा कुठलाही व्यवहार झाला नसल्याचे लेखी दिले आहे. शिवाय ग्रामपंचायतीने सदर शाळेतील एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे दिले आहे. पंचायत समित उपसभापतींनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे या प्रकरणात कारवाई व्हावी, असे तोडकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
अडगाव शाळेचा कारभार ‘सीईओं’च्या दरबारात
By admin | Published: April 11, 2016 2:37 AM