लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मागील दोन वर्षात अमुलाग्र बदल झाला. प्रशासकीय वचक असल्याने सर्वच अधिनस्त यंत्रणा कामाला प्राधान्य देत होती. दुर्दैवाने आता प्रशासकीय वचक सैल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होत असून ग्रामीण भागातील रुग्णांची परवड होत आहे.वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण तपासणीचा वेळ हा दुपारी २ वाजेपर्यंत आहे. मात्र बाह्य रुग्ण तपासणी कक्षात बऱ्याचदा वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या डॉक्टरांच्या अधिनस्त यंत्रणाही दुपारी १२ नंतर दिसेनासी होते. ग्रामीण भागातून येणाºया रुग्णांना आल्यापावली परत जावे लागते. रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांनी कठोर शिस्त लावली होती. याचा लाभ थेट रुग्णांना मिळत होता. इतकेच नव्हे तर प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या प्रत्येक डॉक्टर व कर्मचाऱ्याला कौतुकाची थापही मिळत होती. आता कोरोना संकटामुळे रुग्णालयीन यंत्रणेवर मार्च महिन्यापासून ताण वाढला आहे. याच स्थितीत अधिष्ठाता म्हणून डॉ. आर.पी. सिंग यांनी महाविद्यालयाची सूत्रे स्वीकारली. येथील परिस्थितीचा अभ्यास होण्यापूर्वीच त्यांना कोरोनाविरूद्ध लढा द्यावा लागत आहे. याच स्थितीचा फायदा काही महाभाग घेत असल्याचे दिसून येते.खासगी रुग्णालयांमध्ये अपवादानेच उपचार होतो. त्यामुळे गरीब रुग्णांसोबतच सामान्यांनाही आता शासकीय रुग्णालयाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे बाह्य रुग्ण तपासणी विभागात रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. शस्त्रक्रियेच्या बाबतीतही इलेक्टीव्ह शस्त्रक्रिया केल्या जात आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोना संसर्गासोबत लढा हाच प्राधान्यक्रम असल्याने आपसुकच इतर विभाग व तेथील कामकाजावर दुर्लक्ष होताना दिसत आहे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणा याचाच काही प्रमाणात फायदा घेताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पहूर येथील एक रुग्ण तपासणीसाठी नेत्ररोग विभागात गेला. दुपारी १.३० वाजता त्या रुग्णाला तपासणी न करता अक्षरश: हुसकावून लावण्यात आले. तो गरीब रुग्ण परत गेला. अक्षरश: रुग्णांना हाकलण्याचे प्रकार बाह्य रुग्ण तपासणी विभागात होत आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टर व इतरही डॉक्टरांना रुग्णांशी सौजन्याने बोला, असे वारंवार सांगितले जाते. मात्र गरीब रुग्णांना पशुपेक्षाही हीन भाषेचा वापर करून अपमानित केले जाते. अर्थात असे करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मात्र यामुळे संपूर्ण यंत्रणाच बदनाम होते. अशांचा प्रशासनाने बंदोबस्त करणे गरजेचे आहे.पुरवठादाराच्या तक्रारीने खळबळवैद्यकीय महाविद्यालयाच्या मेसमध्ये पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराने बिल अडकविल्याबाबत तक्रार केली. इतकेच नव्हे तर त्याने काही दिवस पुरवठा थांबविला होता. आर्थिक डिमांड पूर्ण करण्यासाठी पुरवठादारावर दबाव आणला जात होता. त्यानेही तक्रार अर्ज लिहून उघड भूमिका घेतली. त्यानंतर दबाव आणणाऱ्याने नमते घेतले व पुरवठादाराने दिलेली तक्रार वरिष्ठांपर्यंत जाण्याआधीच फाडण्यात आली.रजा मंजूरीसाठी लागते चिरीमिरीप्रशासनामध्ये कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करून घेण्यासाठी चिरीमिरी द्यावी लागत आहे. मात्र याबाबत अधिकृत तक्रार कुणीच देण्यास तयार नाही. हा गंभीर प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. यापासून वरिष्ठ अनभिज्ञ आहेत. मात्र याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होताना दिसत आहे. वरिष्ठांनी याचा शोध घेण्याची गरज आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय घडी झाली सैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM
वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण तपासणीचा वेळ हा दुपारी २ वाजेपर्यंत आहे. मात्र बाह्य रुग्ण तपासणी कक्षात बऱ्याचदा वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या डॉक्टरांच्या अधिनस्त यंत्रणाही दुपारी १२ नंतर दिसेनासी होते. ग्रामीण भागातून येणाºया रुग्णांना आल्यापावली परत जावे लागते. रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांनी कठोर शिस्त लावली होती.
ठळक मुद्देरुग्णांची परवड : बाह्य रुग्ण तपासणीत वरिष्ठ डॉक्टर फिरकेना