पिण्याचे पाणी नाही : पैनगंगा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे. तसेच पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील विदर्भातील ५० व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. यावर्षी हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडली. त्यानंतर कसा तरी एप्रिल महिना निघाला. आता मे महिना तर नागरिकांना नकोसा झाला आहे. कारण पिण्याचेही पाणी गावांमध्ये उपलब्ध नाही. नागरिकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुराचा फटका व हिवाळा, उन्हाळ्यात पाणीटंचाई दरवर्षीच येथील नागरिकांच्या नशिबी आहे. गेल्या १५ वर्षापासून इसापूर धरणावर अवलंबून असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा डाव्या कालव्याचे काम रखडले आहे. हे काम अपूर्ण असल्याने आणि कालव्यात मोठेमोठे झाडे झुडपे वाढल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच पैनगंगा नदी आॅगस्ट महिन्यापासून कोरडी पडली असल्याने दोन्ही भागातील शेतकऱ्यांसह रहिवासी वस्तीसाठी असलेल्या नळयोजनासुद्धा पाण्याअभावी बंद पडल्या आहे. पैनगंगा नदीत आणि डाव्या कालव्यात आवश्यक त्या प्रमाणात पाणी सोडले गेले नाही. माणसांसह जनावरांनाही आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी रबीचा गहू, हरभरा, करडी व सूर्यफुलासारखे पीक पाण्याअभावी वाऱ्यावर सोडले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोरी, कोठा, चातारी, देवसरी, कोपरा, माणकेश्वर, वीरसनी, दिघी, घामापूर, सिंदगी, सावळेश्वर, भोजनगर, दिघडी, कारखेड, उंचवडद, साखरा, खरूस, चालगणी आदींसह विदर्भातील ५० गावांना व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये पाणीच नसल्यामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक वर्षांपासून इसापूर धरणाच्या ६५ किलोमीटर डाव्या कालव्याचे अर्ध्यावर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. पैनगंगा नदीत बारमाही पाणी उपलब्ध राहण्यासाठी नदीपात्रात कोल्हापुरी बंधारे उभारावेत, कालव्यासाठी अधिग्रहीत केलेल्या चालू भावाप्रमाणे मोबदला द्यावा, ऊर्ध्व पैनगंगा कार्यालय विभाग क्र.५ हे उमरखेड येथे स्थलांतरीत करावे आणि विदर्भ-मराठवाड्याच्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा सिंचनाचा अनुशेष भरून काढावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांच्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या न्याय मागण्यांबाबत विचारच करण्यात आला नाही. प्रशासकीय अधिकारी व संबंधित मंत्र्यांना याबाबत अनेकवेळा निवेदने देवूनही पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे हिवाळ्यात रबी पिकांवरही पाणी सोडावे लागते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता अर्धवट कॅनॉलची कामे पूर्णत्वास नेवून पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारावे, अशी मागणी चक्रधर देवसरकर, अॅड.अनिल माने, कैलास वानखेडे, कैलास माने, तुकाराम माने, धनंजय माने, सुनील देवसरकर, राहुल माने, भगवान माने, बळवंत माने आदींसह ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. नियोजन आवश्यक पैनगंगेच्या काठावरील ५० हून अधिक गावांमध्ये दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु तरीदेखील योग्य नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना शेती तर सोडाच पिण्याच्याही पाण्यासाठी भटकावे लागते.
५० गावांमध्ये ठणठणाट
By admin | Published: May 27, 2017 12:18 AM