संजय भगत
महागाव : अंगणवाडी केंद्रातून दिली जाणारी आहारातील चटणी भेसळयुक्त असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांनी बोलून दाखवल्या. शून्य ते सहा वयोगटांतील मुलांना महागाव तालुक्यातील १९१ अंगणवाडी केंद्रातून किमान २२ हजार मुलांना महागाव तालुका महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत आहार पुरवला जातो. गहू, तांदूळ, मूगडाळ, चणा, मीठ, चटणी आणि आता साखरेची नव्याने भर पडलेली आहे. नियमित आहारातून गोडेतेल गेल्या काही महिन्यांपासून गायब झाले आहे. संबंधित एजन्सीकडून दिला जाणारा आहार त्यापैकी मूगडाळ आणि चटणी फार काही खाण्यायोग्य नसल्याचे अनेक लाभार्थ्यांनी सांगितले आहे.
कोविड संसर्गामुळे अंगणवाडी केंद्रातील मुलांची प्रत्यक्ष उपस्थिती बंदच आहे. त्यांना देण्यात येणारा आहार १ किलोच्या बंद पाकिटामध्ये घरपोच पुरवले जात आहे. ५० दिवसांच्या फरकाने प्रत्येकी आहार दोन किलोचे पाकीट दिल्या जात असल्याची माहिती धनोडा येथील लाभार्थी महिला लताबाई खंदारे यांनी सांगितले. इतर आहाराचे पाकीट बऱ्यापैकी आहे. परंतु चटणी बरीच भेसळयुक्त वाटते. ती खाण्यायोग्य नाही. तिचा आम्ही वापर करत नाही. इतर धान्य ठीक आहे.
सवना येथे वाटप करण्यात आलेल्या आहारामध्ये चटणी पाकीट देण्यात आले नाही. त्याऐवजी जास्तीचे हळद पाकीट देण्यात आले. आहारातील धान्य वाटपात सातत्य नसते. अधूनमधून कधी डाळ तर कधी चना दिल्या जातो. पूर्वी खाद्यतेल देण्यात येत होते. काही दिवसापासून आहारातून ते गायब झाले आहे त्याऐवजी साखरेची भर पडली आहे. चटणी आणि मूग डाळ यातील दर्जा सुधारण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.