लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निळोणा, चापडोह आणि आता बेंबळा प्रकल्पाचे पाणी मिळत असतानाही यवतमाळकर नागरिकांना पाण्यासाठी चटके सोसावे लागत आहेत. शहराला आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा उदासीन आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहराची तहान भागविली जात आहे. वरिष्ठांपासून ते बहुतांश अधिकारी-कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसून येते. यवतमाळ शहराला मागील दोन महिन्यांपूर्वीपर्यंत निळोणा, चापडोह या प्रकल्पांतून पाणीपुरवठा केला जात होता. शहराच्या जवळपास प्रत्येक भागामध्ये आठ दिवसाआड पाणी नळाला सोडले जात होते. दोन महिन्यांपासून बेंबळा प्रकल्पाचे पाणी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. अलीकडे दोन आठवड्यांपासून मात्र पाणीपुरवठ्याची संपूर्ण घडी विस्कळीत झाली आहे. याला प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असल्याचे बोलले जाते. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाहीत, अशी कारणे यासाठी सांगितली जातात, तर दुसरीकडे पाण्याच्या टाक्यांमधून धो-धो पाणी वाहते. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या पाण्याच्या अपव्ययाचा हिशेबच नाही. शहरात लिकेजमधून पाणी वाहते. दुरुस्ती करूनही त्याच त्या ठिकाणी होणारे लिकेज संशयाला जागा निर्माण करून देणारे आहे. अशावेळी कितीही प्रकल्पाचे पाणी आणले तरी टंचाई जाणवणारच अशा तीव्र भावना नागरिकांमधून उमटत आहेत. पाण्याची साठवणूक करण्यासाठी लोकांकडे मर्यादित साधने आहेत. घरातील पाणी संपल्यानंतर हातपंपाशिवाय उपाय नाही. शरीराची काहिली करणारे ऊन तापत आहे. त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते.
चापडोहमध्ये ६० टक्के पाणी- अर्ध्या अधिक शहराची तहान भागविणाऱ्या चापडोह प्रकल्पात अजूनही ६० टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. निळोणा प्रकल्पही ४० टक्के भरून आहे. गतवर्षीही अखेरपर्यंत इमर्जन्सी वापरले गेलेले नव्हते. यावेळी तर बेंबळा सोबतीला आहे. याही परिस्थितीत पाणीप्रश्न निर्माण झाल्यास प्राधिकरणाची यंत्रणाच जबाबदार राहील हे तेवढेच खरे.
अधिकाऱ्यांकडे बोलायला वेळ नाही- यवतमाळ शहरातील नागरिक पाणीटंचाईचे चटके सहन करीत असताना अधिकाऱ्यांकडे त्यांच्याशी बोलायला वेळ नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काही वरिष्ठ अधिकारी फोनही उचलत नाहीत. काही जणांचा मोचाइल स्वीच ऑफ दाखवितो. - कार्यालयातील फोन तर कायम व्यस्त असतो. शिवाय जबाबदार (?) अधिकारी बऱ्याच वेळा कार्यालयात उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. अशा वेळी समस्या मांडायची कुणाकडे, हा प्रश्न आहे. पाण्याची कृत्रिम टंचाई शहरात निर्माण होत आहे.