जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी : चौकशी समितीकडून प्राथमिक अहवाल यवतमाळ : पुसद तालुक्यातील बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेत आतडे कापल्याने एक महिला ठार झाली, तर दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानउघाडणीनंतर दोन डॉक्टरांना शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेला तब्बल १५ दिवस लोटले. मात्र आरोग्य यंत्रणा कारवाईस धजावत नव्हती. खुद्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची कानऊघाडणी केल्यानंतर ही तसदी घेण्यात आली. कुटुंब कल्याणशस्त्रक्रियेत आतडे कापल्याने शारदा वाघू काळे या महिलेचा २१ जानेवारीला यवतमाळ शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला होता. इतर दोन महिलांची प्रकृती गंभीर होती. मृत महिलेच्या नातेवाईकांनी बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सातपुते याच्याविरूद्ध तक्रार दिली. मात्र वैद्यकीय चौकशी समितीचा अहवाल न आल्याने याप्रकरणी अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. त्यात यात कोणतीच कारवाई न झाल्याचे बघून त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना धारेवर धरले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शल्य चिकित्सकांनी प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. त्यावरून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील सातपुते आणि पुसद तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर भोंगाडे यांना गुरूवारी कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. खंडाळा पोलिसांनी मात्र या प्रकरणात कोणतीच कारवाई केली नाही. त्यांना शल्य चिकित्सांच्या अध्यक्षतेतील समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र अभिप्राय असलेल्या अहवालाची आवश्यकता असल्याचे ठाणेदार बी. एस. जाधवर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)
बेलोराच्या डॉक्टरांना १५ दिवसानंतर ‘शो कॉज’
By admin | Published: February 04, 2017 1:01 AM