सरपंचपदी गाजीपूरच्या शीतल प्रमोद शेलकर, तर उपसरपंचपदी वडगावचे पंजाब हरिदास जाधव यांची निवड झाली. वडगाव (गाढवे) आणि गाजीपूर या दोन गावांमिळून गट ग्रामपंचायत आहे. नऊ सदस्य असलेल्या या गट ग्रामपंचायतीमध्ये वडगावची लोकसंख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे तेथील सहा, तर गाजीपूरचे तीन सदस्य आहेत.
जास्त सदस्य संख्या असल्याने नेहमी सरपंचपदावर वडगावचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, यावेळच्या निवडणुकीत तब्बल ५० वर्षांनंतर हे चित्र बदलले. गाजीपूरवासीयांनी तीन सदस्यांच्या भरवशावर हे पद गावात खेचून आणले म्हटल्यास वावगे ठरू नये. तेथील भोयर गटाचे विनोद भोयर, शीतल शेलकर व जयश्री प्रकाश मानकर हे सदस्य निवडून आले. वडगाव येथील निवडून आलेल्या दोन सदस्यांना सोबत घेऊन आघाडी करण्यात आली. २४ फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच गाजीपूरच्या शीतल शेलकर, तर उपसरपंचपदी वडगावचे पंजाब जाधव निवडून आले. अनेक वर्षांनंतर गावाला सरपंचपद मिळाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता गावात झपाट्याने विकासकामे होतील, अशी अपेक्षा आहे.