लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नगर परिषदेच्या हद्दवाढीत चिखलगाव ग्रामपंचायत क्षेत्रातून पालिका क्षेत्रात गेलेल्या विद्यानगरी वसाहतीला अखेर शुक्रवारी न्याय मिळाला. या नगरीला पालिकेने सामावून घेतले असून आवश्यक सोईसुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतली.वणी शहराच्या उत्तर दिशेला जवळपास १५० घरांची ४०० लोकसंख्या असलेली विद्यानगरी ही वसाहत आहे. ही वसाहत चिखलगाव ग्रामपंचायत क्षेत्रात समाविष्ठ होती. त्यामुळे रस्ते, वीज, पाणी या समस्या ग्रामपंचायतीकडूनच पुरविल्या जात होत्या. मात्र राज्य शासनाने २८ मार्च २०१८ ला काढलेल्या शहराच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेत विद्यानगरीचा सर्व्हे नंबर पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या वसाहतीवर कोणताही खर्च करू नये, असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी चिखलगाव ग्रामपंचायतीला दिले. तरीही उन्हाळ्याचे दिवस म्हणून ग्रामपंचायतीने या वसाहतीचा पाणी पुरवठा सुरू ठेवला.चिखलगाव ग्रामपंचायतीने ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना प्रसिद्ध करून पालिकेचा पाणी पुरवठा १ जूनपासून बंद केला. त्यामुळे वसाहतीमधील नागरिकांची गैरसोय झाली. नागरिकांनी अखेर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे धाव घेतली. बोदकुरवार यांनी चिखलगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नगरपालिकेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली. या बैठकीला आ.बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती उपसभापती संजय पिंपळशेंडे, सरपंच अनिल पेंदोर, उपसरपंच अमोल रांगणकर, या क्षेत्राचे सदस्य अनिल ताजने, गटविकास अधिकारी राजेश गायनार यांची उपस्थिती होती. सर्वांनी विचारविनीमय करून अखेर ही वसाहत पालिकेने आपल्या ताब्यात घेतली. पाणी पुरवठा योजनेच्या चाव्या हस्तगत केल्या. वसाहतीत इतर सोईसुविधा देण्याचे वचनही नगराध्यक्षांनी यावेळी दिले. शनिवारी या भागातील रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवातही करण्यात आली. मात्र या हद्दीवाढीमुळे आता विद्यानगरीवासीयांना शहराच्या दराने मालमत्ता कर द्यावा लागणार आहे.
विद्यानगरी अखेर पालिकेत समाविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:05 PM
नगर परिषदेच्या हद्दवाढीत चिखलगाव ग्रामपंचायत क्षेत्रातून पालिका क्षेत्रात गेलेल्या विद्यानगरी वसाहतीला अखेर शुक्रवारी न्याय मिळाला. या नगरीला पालिकेने सामावून घेतले असून आवश्यक सोईसुविधा पुरविण्याची जबाबदारी घेतली.
ठळक मुद्देहद्दवाढीची अंमलबजावणी : वणी नगर परिषद पुरविणार नागरी सोईसुविधा