जिल्हा परिषद निवडणूक यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील डोल्हारी व पुसद तालुक्यातील गायमुखनगर जिल्हा परिषद गटातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. डोल्हारी गटातील काँग्रेसच्या उमेदवार नलू ठाकरे यांनी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अथवा प्रकरण दाखल केल्याची पावती जोडली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज रद्द झाला. गायमुखनगर येथील काँग्रेसच्या उमेदवार सविता खंदारे यांचाही अर्ज बाद ठरविण्यात आला. दारव्हा तालुक्यात महागाव गणाचे काँग्रेस उमेदवार रवी ठाकरे यांचा अर्ज शौचालय प्रमाणपत्र नसल्याने रद्द झाला. मात्र त्यांनी भाजपाकडून सादर केलेल्या अर्जासोबत प्रमाणपत्र असल्याने तो अर्ज कायम राहिला. पुसद तालुक्यात आडगाव गणात काँग्रेसचे कैलास मार्कंड व राष्ट्रवादीचे श्रीकांत चव्हाण, तसेच पांढुर्णा गणातील काँग्रेस उमेदवार नीलम राठोड यांचेही अर्ज बाद झाले. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी ५३९ तर पंचायत समितीच्या ११० जागांसाठी ९३३ अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी छाननी दरम्यान जिल्हा परिषदेचे १३ तर पंचायत समितीचे २४ अर्ज बाद झाले. आता जिल्हा परिषदेसाठी ५२६ तर पंचायत समितीसाठी ९०९ उमेदवार रिंगणात आहे. (शहर प्रतिनिधी)
काँग्रेसच्या दोघांचे अर्ज बाद
By admin | Published: February 03, 2017 2:10 AM