लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचे... मग वकिलांनी कायद्याचा किस पाडून गुन्हेगारांना सोडवायचे.. किती दिवस चालायचे हे? त्यापेक्षा बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे करणाऱ्यांना असेच रस्त्यावर पळवून ‘ठोकले’ पाहिजे. सीमेबाहेरून देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून मारले. हैदराबादच्या पोलिसांनी देशात राहून देशाच्या सभ्येतला गालबोट लावणाऱ्यांना संपविले. हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, पण तो इंटरनल, टेक्निकल स्ट्राईक होता...यवतमाळातील तरुणाईच्या शब्दांना धार चढली होती. हैदराबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला क्रूरपणे मारण्यात आले. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देशभरातून होत असतानाच यवतमाळकरांची जनभावनाही भडकली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी यातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी धाडले. ही वार्ता यवतमाळात धडकताच तरुणाईने आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.‘आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनीही अशा नराधमांना कापूनच काढले असते’ सळसळत्या तरुणाईचे हे उद्गार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना अशाच शिक्षा दिल्या जात होत्या. दुष्कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवायची नाही तर काय, जेलमध्ये त्यांची बडदास्त ठेवायची काय? कायद्याचा धाकच उरला नसेल, तर बंदूकीने ‘ठोकणे’ हाच उपाय आहे... पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाचे हे मत आगामी काळात गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणारे आहे.जोपर्यंत आपल्या देशात आसाराम, रामरहीमसारखे भोंदू आहेत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही, असा संतापही तरुणांनी व्यक्त केला. गुन्हेगारांना जेलमध्ये वर्षानुवर्षे सडवत ठेवण्यापेक्षा त्यांना एका झटक्यात जगाच्या पलिकडे पाठविले पाहिजे.पण तरुणाई म्हणजे, आले मनात तर बोलले क्षणात असेही कोणी म्हणण्याचे कारण नाही. कारण काही तरुणांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयमितही आहेत. ते म्हणाले, आरोपींचा एन्काउंटर झाला हे चांगलेच झाले. पण साऱ्या गोष्टी कायद्याने झालेल्या कधीही चांगल्या असतात.कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.तरुणांनी केले मनमोकळेहैदराबादमधील एन्काऊंटरच्या निमित्ताने यवतमाळातील स्वप्नील शेंडे, रूपेश सोनटक्के, राहुल वानखेडे, सागर ढोरे, प्रज्वल मोरघडे, बुद्धराज दुपारे आदी तरुणांनी ‘लोकमत’कडे आपली मते दिलखुलास मांडली.
हैदराबाद ‘एन्काऊंटर’नंतर यवतमाळात आनंदाची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 6:00 AM
कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.
ठळक मुद्देयवतमाळच्या तरुणाईची भावना : बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमांना असेच ‘ठोकले’ पाहिजे...