पुसद : मकर संक्रांत म्हणजे १४ जानेवारी असे समीकरण आहे. परंतु यावर्षी जानेवारी महिन्यात संक्रांत १५ तारखेला येत आहे. सात वर्षानंतर हा योग आला आहे. सूर्य १४ जानेवारीला मध्यरात्री १.२६ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे १५ जानेवारीला दिवसभर संक्रांतीचे पर्व साजरे करता येईल. तुळशी विवाहनंतर लग्न सराईला जोरदार सुरुवात झाली होती. मात्र १६६ जानेवारीपासून पुन्हा एक महिन्यासाठी विवाह मुहूर्त नाही. मार्गशीर्ष शुल्क पक्षाची पंचमी तिथी घनिष्टा नक्षत्रावर १६ डिसेंबरपासून मलमास सुरु होणार आहे. या दिवशी सूर्य वृश्चिक राशी सोडून धनू राशीत प्रवेश करील. १५ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर संक्रांतीचे पर्व सुरू होईल. संक्रांतीच्या पुण्यकाळाला सकाळी सूर्योदयापासून प्रारंभ होईल. तर सायंकाळी ५.१५ मिनिटापर्यंत हा काळ असेल. यापूर्वी २००८ मध्ये १४ जानेवारीला मध्यरात्री १२.०९ मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला होता. त्यावेळी संक्रांत १५ जानेवारीला आली होती. पृथ्वी सूर्या भोवती फिरते, त्यामुळे सूर्याचे प्रत्येक राशीत संक्रमण होते. सूर्याच्या फिरण्याच्या गतीवर संक्रमण अवलंबून असते. सात वर्षानंतर १५ जानेवारीला येत असलेल्या मकर संक्रांतीचे वैशिष्ट्ये आगळेवेगळे असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
सात वर्षानंतर मकरसंक्रांत आली १५ जानेवारीला
By admin | Published: January 11, 2016 2:20 AM