पांढरकवडा : आदिवासी जनसेवक तथा केळापूर येथील जगदंबा संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांनी ७६ व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यांनी मृत्युला हुलकावणी दिली.
सिडाम यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना प्रथम पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधीक्षक डॉ. संजय तोडासे यांनी तपासणी केली. त्यात कोरोना पॉझिटिव्हची लक्षणे आढळली. त्यामुळे सिडाम यांना एचआरसिटी करण्याचा सल्ला देण्यात आला. तपासणी केली असता एचआरसीटी रिपोर्ट ११ आला. त्यामुळे वामनराव सिडाम यांना लगेच यवतमाळ येथील कोविड केअर सेंटरमध्ये अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले.
सिडाम यांना दमा, डायबिटीज, शुगर, श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होत असल्याने डॉ. प्रमोद लोणारे, डॉ. सुमेध गुडदे, डॉ. स्वप्निल मानकर, डॉ. सुबोध तिखे, डॉ. मुजमिल कोशीश यांनी तब्बल १५ दिवस शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्यावर उपचार केले. परिणामी सिडाम कोरोनातून सुखरूप बाहेर आले. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मिळविलेला विजय आपल्यासाठी एकप्रकारे पुनर्जन्माचा अनुभव असल्याचे सिडाम यांनी सांगितले.
बॉक्स
त्या १५ दिवसांचा अनुभव नकोसा
कोरोनातील तो १५ दिवसांचा काळ खूप भयानक व परीक्षा घेणारा होता. आपण अक्षरश: मृत्यूच्या दारापर्यंत गेलो होतो. मात्र, सकारात्मक व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि डॉक्टरांच्या योग्य उपचारामुळे कोरोनाविरुद्धची जीवघेणी लढाई जिंकल्याचे सिडाम यांनी स्पष्ट केले. कोरोना हा गंभीर आजार आहे. त्यामुळे कुणीही याला हलक्याने घेऊ नये, असे सांगताना त्यांनी संक्रमितांनी भीती न बाळगण्याचा व सदैव पॉझिटिव्ह विचार राहण्याचा संदेश दिला. रुग्णालयातील सफाई कर्मचारी प्रमोद ब्राह्मणे, प्रमोद उसरे यांनीही सेवा केली. त्याबद्दल यांचेही सिडाम यांनी आभार मानले.