सत्यमेव जयते : दुष्काळ मुक्तीसाठी सरसावल्या आंजीच्या दोन बहिणीयवतमाळ : दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही. जेवणाची, शिक्षणाची ददात. तरीही मनात मात्र गावाच्या विकासाचा ध्यास. स्वत:चे अभावग्रस्त जीवन सावरता सावरता अख्ख्या गावाचा परिघ विकासाच्या सुगंधाने दरवळून जावा यासाठी त्या दोघी बहिणींनी पराकोटीचे कष्ट सुरू केले आहे. अंगमेहनतीपेक्षाही इतरांकडून होणारी अवहेलना दुर्लक्षित करण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पदर खोचून कामाला लागलेल्या या दोन बहिणी राळेगाव तालुक्यात चर्चेत आहेत. मनीषा पिंपरे आणि प्रगती पिंपरे, अशी या दोन तरुणीची नावे. आपले आंजी हे गाव दुष्काळमुक्त करण्याचा चंग या दोघींनी बांधला. डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. घरात गरिबी. आईसोबत मजुरीला जाताजाताच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आईचा आधार बनलेल्या या मुली आता संपूर्ण गाव दुरूस्त करण्याच्या इराद्याने झपाटल्या. आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून आपलेही गाव दुष्काळमुक्त व्हावे, ही त्यांची धडपड आहे. स्पर्धेसाठी पोटगव्हाण येथे प्रशिक्षण सुरू होताच आंजी गावाच्यावतीने मनीषा पिंपरे, प्रगती पिंपरे आणि दादाराव कोवे हे तिघेजण प्रशिक्षणाला गेले. प्रशिक्षण घेऊन परतल्यावर त्यांनी संपूर्ण गावाचा सहभाग मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून गावातून रॅली काढणे, बचत गटाच्या बैठका घेणे, गावातील पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक आणि प्रतिष्ठित नागरिकांना जागविण्याचे काम त्यांनी सुरू केले. श्रमदानाच्या यज्ञात किमान एक तास सहभाग द्यावा म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर निमंत्रणाच्या अक्षता वाटल्या. शिवारापासून गावापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वृक्षारोपणाचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी दररोज पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे भर उन्हात त्या हाता सब्बल आणि टिकास घेऊन वृक्ष खड्डे करीत आहे. त्यांच्या कोवळ््या हातांनी आतापर्यंत ७७ खड्डे पूर्ण केले. एकदा तर खड्ड्यातून निघालेल्या सापाला सब्बलचा घाव लागला. त्यामुळे मनीषा घाबरून घरी गेली, मात्र दुसऱ्या दिवशी येऊन पुन्हा काम सुरू केले. श्रमदानाचा वसा घेऊन २२ मे पर्यंत काम करण्याचा या बहिणींचा निर्धार पक्का आहे. आईनेही त्यांच्या इच्छाशक्तीला बळ देत घरी शोषखड्डा करण्यासाठी मदत केली. (स्थानिक प्रतिनिधी)समाजासमोर आदर्श गावाच्या विकासासाठी श्रमदानाचा अनोखा आदर्श मनीषा आणि प्रगतीने समोर ठेवला आहे. आज ना उद्या या गावातील प्रत्येक नागरिक जागरूक होऊन त्या गावाचा दुष्काळ इतिहासजमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वय कोवळे पण निर्धार कठोर
By admin | Published: April 30, 2017 1:13 AM