सत्ताधाऱ्यांची कसोटी : शिवसेना सदस्यांना सत्ता न मिळाल्याचे शल्य कायम टोचत राहणार यवतमाळ : जिल्हा परिषदेत यावेळी प्रथमच कधी नव्हे एवढे आक्रमक विरोधक दिसणार आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. आत्तापर्यंत बहुतांशवेळा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. कालपर्यंतही याच दोन पक्षांचे वर्चस्व कायम होते. मात्र या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपाने या दोन्ही पक्षांपेक्षा जादा जागा पटकावित जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेवर आत्ता युतीची सत्ता येणार, असे वाटत असतानाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एका रात्रीतून सारेच समीकरण बिघडले. यातून कमी जागा जिंकूनही काँग्रेसला आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीलाही सत्तेत सहभागाची संधी मिळाली. सत्ता स्थापनेचे समीकरण जवळपास जुळल्यात जमा असताना सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने उपाध्यक्षपद पदरात पाडून जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या परिघात प्रथमच प्रवेश केला आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणातून अखेर जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन झाली. मात्र सर्वात मोठा पक्ष असलेला शिवसेना सत्तेबाहेर फेकला गेल्याने त्यांच्या सदस्यांना शल्य टोचत आहे. हे शल्यच त्यांना आक्रमक विरोधक म्हणून जिल्हा परिषदेत नवीन ओळख मिळवून देण्याची शक्यता आहे. जवळ आलेली सत्ता ऐनवेळी दुरावल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंगळवारीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रचंड घोषणाबाजी करून त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. तेथेच भाजपाचे कार्यकर्तेही आक्रमक होते. यातून या दोन्ही पक्षांमध्ये आगामी काळात जिल्हा परिषदेत खटके उडणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यात शिवसेना आधीच आक्रमक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांचे सदस्य खरच किती आक्रमक होतात, हे आगामी काळात जिल्हावासीयांना कळणार आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत प्रथमच आक्रमक विरोधक
By admin | Published: March 23, 2017 12:12 AM