अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतानाही यवतमाळची शान असलेली शकुंतला रेल्वे मात्र अजूनही ब्रिटिश गुलामगिरीची शताब्दी भोगत आहे. याविरुद्ध ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर अमरावती आणि अकोला जिल्ह्यातून शकुंतलाचे अस्तित्व टिकविण्यासाठी लोकचळवळ उभी झाली आहे. मात्र यवतमाळकर अजूनही मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. कंपनीचा करार आता संपुष्टात येऊनही भारतीय रेल्वेने शकुंतला अद्याप ताब्यात घेतलेली नाही. उलट गेल्या पाच वर्षांपासून ही रेल्वे बंद पडलेली आहे. सुस्थितीत असलेले रेल्वे रूळ, पूल, रेल्वेस्थानक व अन्य मालमत्ता सध्या बेवारस स्थितीत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी, मजूर, दूध विक्रेते आदींच्या दृष्टीने ही रेल्वे परत सुरू होणे गरजेचे आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला. १५ ऑगस्ट रोजी ‘देश स्वतंत्र झाला तरी शकुंतला शंभर वर्षांपासून पारतंत्र्यातच’ हे वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथील शेतकरी नेते विजय विल्हेकर यांनी अमरावती व अकोल्यातील नागरिकांना एकत्र आणून शकुंतला बचाव आंदोलनाचे रणशिंग फुंकले. शकुंतला एक्सप्रेस प्रवासी मंडळ स्थापन करून अमरावतीत दोन बैठकाही घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी मूर्तिजापूर रेल्वे स्थानक गाठून या आंदोलकांनी मध्य रेल्वे भुसावळचे क्षेत्रीय उपप्रबंधक यांना निवेदन पाठविले. ब्रिटिश गुलामीतून शकुंतलेला मुक्त करून भारत सरकारने ही रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. निवदेनातून या लोकचळवळीचा श्रीगणेशा झाला असला तरी हा प्रश्न धसास लावण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाणार आहे, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन विजय विल्हेकर यांनी केले. वर्षभरात तीन लाख नागरिकांचा प्रवास ही नॅरोगेज रेल्वे मेळघाटातील तसेच यवतमाळातील आदिवासी, शेतकरी आणि मजुरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती बंद असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला. मेळघाटात कुपोषण वाढले, असा दावा आंदोलकांनी केला आहे. या रेल्वेने परिसरातील मजूर अचलपूर, मूर्तिजापूर येथे पोहोचून देशाच्या विविध प्रांतात रोजगारासाठी जात होते. रेल्वे मार्गावरील मालमत्ताही आता समाजकंटकांच्या तावडीत सापडली आहे. १९६०-६१ साली तीन लाख ११ हजार प्रवाशांनी शकुंतलातून प्रवास केल्याची नोंद बनोसा रेल्वे स्थानकात आढळते. तर २३३ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाल्याचेही कळते. यावरून या रेल्वेचे महत्त्व स्पष्ट होत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
शकुंतलेच्या अस्तित्व टिकविण्यासाठी यवतमाळकरांनीही या आंदोलनात जुळावे. शकुंतलेच्या मार्गावरील यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांकडून ठराव घेतले जाईल. तूर्त अंजनगाव आणि मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षांनी त्याला संमतीही दिली आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या सफाईचा कार्यक्रमही राबविला जाईल. पुढच्या काळात आंदोलन अधिक तीव्र होईल. - विजय विल्हेकर, शकुंतला बचाव आंदोलनाचे प्रणेते