राळेगाव : तालुक्यात मागील काही महिन्यांत मोठ्या संख्येने शेतकी कंपन्या स्थापन झाल्या असून, त्या कार्यप्रवण करण्याच्या दृष्टीने शेतकरी भागधारक मिळविण्यासाठी संचालक कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांनी या कंपन्यांचे शेअर खरेदी करावे यासाठी लहान-मोठ्या गावात सभा, मेळावे घेतले जात असून, कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेअर घेण्यासाठी विनवणी करीत आहेत.
१३४३ लोकसंख्येच्या देवधरी येथे राज्यातील पहिल्या आदिवासी सहकारी सूत गिरणीची मुहूर्तमेढ दोन वर्षांपूर्वी रोवली. त्याच देवधरी येथे एक शेती कंपनी प्रकल्प येऊ घातला आहे. आठशे लोकसंख्येच्या आठमुरडीतही शेती कंपनी स्थापन झाली असून शेतकरी भागधारकांची जुळवाजुळव सुरू आहे. ही दोन्ही आदिवासी गावे असून देवधरी राष्ट्रीय महामार्गावर तर आठमुरडी आडवळणावरील गाव आहे. कळमच्या दहा युवक-युवतींनी स्थापन केलेल्या शेतकी कंपनीने पहिल्याच वर्षी सव्वा कोटी रुपयांचा व्यवसाय मिळविलेला असल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे. शेतकऱ्यांना शेअर घेण्यासाठी कंपनी प्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. अनेक गावात शेतमालावर आधारित कंपन्या स्थापन करण्याकरिता शेतकऱ्यांची सुशिक्षित तरुण मुले प्रयत्नरत आहेत. त्यामुळे शेतीतील मरगळीसह तोटाही दूर होण्याची आशा वाढली आहे. कृषी कंपन्यांमुळे बाजार समित्यांपुढेही आव्हान उभे राहिले असून, त्यांनाही कारभारात सुधारणा कराव्या लागणार आहेत. बाजार समितीचे मुख्य उत्पन्न कापूस विक्रीवर मिळणारा सेस आहे. सध्या तरी या क्षेत्रात शेती कंपन्या उतरलेल्या नाहीत. पुढे कापूस क्षेत्रातही अशा कंपन्या उतरल्यास किंवा खासगी बाजार समित्या स्थापन झाल्यास बाजार समितीपुढे मोठे आव्हान उभे राहिलेले दिसेल.