महागाव : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून विदर्भ सिंचन कार्यक्रम राबविला जात आहे. मात्र महागाव येथील तालुका कृषी विभागाने या कार्याला नख लावले. १४ लाख रुपयांचा गाळ कागदोपत्री काढल्याचे दाखविले. एवढेच नाही तर पंचायत समिती उपसभापतीच्या नावे धनादेशही काढण्यात आला. महागाव तालुक्यातील उटी ते हिंगणी या पाच किलोमीटर अंतरात असलेल्या नाल्यावर २००८ साली सिमेंटचे चार बांध घालण्यात आले. या बांधातील साचलेला गाळ काढण्याची ही उठाठेव करण्यात आली. आपल्या अधिनस्त मंडळ अधिकाऱ्यांच्यामार्फत तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांनी बिले सादर करण्यास सांगितले. दरम्यान रणवीर आजारी रजेवर गेले. त्यामुळे काम रखडले. रणवीर यांचा पदभार मंडळ अधिकारी बी.एच. राठोड यांच्याकडे देण्यात आला. राठोड यांनी बनावट बिले काढणार नाही म्हणून सर्वांना दम भरला. नव्हे तसे पत्रच तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी पुसद यांना २० फेब्रुवारी रोजी दिले. रणवीर यांनी कामावर रुजू होताच १४ लाख रुपये काढण्यासाठी कोषटवार या मंडळ अधिकाऱ्यांना बदलून मर्जीतील उल्हास राठोड यांची नेमणूक केली. १४ लाखांचे बिल आणि बनावट मोजमाप पुस्तक तयार केल्याचा आरोप आहे. यावरही बी.एच. राठोड यांनी लेखी आक्षेप घेतला. तसे पत्र २० फेब्रुवारी रोजी दिले आहे. असे असताना १८ फेब्रुवारी रोजी १४ लाख चार हजार २३५ रुपयांचा धनादेश श्रीनिवास देशमुख यांच्या नावे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने अदा केला. या संदर्भात तालुका कृषी विभागाचे सहायक अभियंता मुकुंद कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी धनादेश दिल्याचे सांगितले. कागदोपत्री झालेल्या या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी ते विदर्भ सिंचन कामाचा आढावा घेणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. ( शहर प्रतिनिधी)
कृषी विभागाने कागदोपत्री काढला बंंधाऱ्यातील गाळ
By admin | Published: March 02, 2015 2:12 AM