यवतमाळ - जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक प्रसंगाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला चार मुली आहेत. या कुटुंबाची व्यथा ऐकल्यानंतर मुंडे यांनी या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील येरद येथील मनोज राठोड व महागाव तालुक्यातील तिवरंग येथील नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबीय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळ येथे आले होते. या दोन्ही कुटुंबांनी घरातील कर्ता पुरुषाच्या निधनानंतर कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती मांडली. यावेळी या भगिनींना रडू कोसळले होते.
घरातील कर्ता शेतकरी पुरुष गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने सांगितले. ही माहिती ऐकताच कृषिमंत्री मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना तत्काळ फोन लावून या दोनही कुटुंबांना अर्थसहाय्य करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मनोज राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी स्वत: घेत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी जटील होतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे उघडे आहेत, असे भावनिक आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले.