यवतमाळ - राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट येथील कंपन्यांनी कामगार कपात केली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
युती सरकार केवळ खोटे आश्वासन देण्यात व्यस्त आहे, पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला आहे. खासदार अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया हे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन गौप्यस्फोट केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल. भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच कोणते जुने नेते नाराज आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपात माजी मंत्री एकनाथ खडसेंची नाराजी सर्वपरिचीत आहे. अनेकवेळा खडसेंनीही ते जाहीरपणे बोलून दाखवले आहे. मात्र, मी भाजपा सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, अजित पवारांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेतील ते जुने आणि ज्येष्ठ नेते कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत, उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या तिकीटावर आपली लढाई नसेल हे स्पष्ट केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल आणि राष्ट्रवादीचे इतरही काही नेते भाजपा-शिवसेनेत जात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे ट्विट केल्याचं दिसून येत आहे.