लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केरळमध्ये थैमान घालत असलेल्या निपा विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाने आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. निपाह सदृश रुग्णांच्या सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अलर्ट राहण्याचे निर्देश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.निपाह विषाणूच्या उद्रेकामुळे केरळच्या केझीकोडे येथे नऊ जणांचा मृत्यू झाला. या विषाणूची सर्वत्र दहशत आहे. आरोग्य यंत्रणेने तातडीने खबरदारीची पावले उचलावी असा आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने काढला आहे. या विषाणूचा प्रसार फळांवर जगणाऱ्या वटवाघूळाकडून होतो. वटवाघुळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने या आजाराचा धोका आहे. डुक्कर व इतर पाळीव प्राण्यांपासून होण्याची शक्यता आहे. निपा या विषाणूच्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे ही लक्षणे आढळतात. लागण झालेल्या ७० टक्के रुग्णाचा मृत्यू अटळ आहे. या आजाराबाबत कुठलेही औषध उपलब्ध नाही. लक्षणावरूच उपचार केला जातो.आजाराचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा व नाकातील स्राव, मूत्र व रक्त नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्टÑीय विषाणू विज्ञान संस्थेत होते. या आजाराबाबत राज्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहून सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. वरील लक्षणे आढळलेल्या रुग्णांचे नमुने तातडीने पुणे येथे तपासणीसाठी पाठवावे, अशा रुग्णाला उपचाराकरिता विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे, डॉक्टर व नर्सनी उपचार करताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.याबाबत आरोग्य सेवा संचालनालयाकडून महाराष्टÑाच्या सर्व जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अहवाल मागविण्यात आला आहे.
केरळातील ‘निपाह’ विषाणूवर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेला अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:21 PM