ग्राम योजना आढावा बैठक : गावांचा सर्वांगिण विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश यवतमाळ : राज्यपाल, खासदार आणि आमदार आदर्शग्राम योजना ही अत्यंत चांगल्या हेतूने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्व विभागांचे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी निवडलेली गावे सर्व सोयींनी युक्त करताना सर्व विभागांनी एकत्रितरित्या या गावांना प्राधान्यावर ठेऊन विकासात्मक कामे राबवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. ते आदर्श ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आदर्शग्रामसाठी बारा गावे लोकप्रतिनिधींनी निवडली आहे. या गावांत शासनाच्या योजना पोहोचविण्यासोबतच या गावातील नागरीकांचे राहणीमान, आचार विचारात बदल घडवून आणावयाचा आहे. प्रामुख्याने गावात आधार नोंदणी, मध्यान्ह भोजन, कुपोषित बालकांची श्रेणीवाढ, आरोग्याच्या सुविधा आदींसोबतच अंगणवाडी, वाचनालय, आरोग्य केंद्र या भौतिक सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा लागणार आहे. या गावाच्या विकासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष अधिकाऱ्यांनी गावाचा एकत्रित आराखडा तयार करून तो लोकप्रतिनिधींच्या मान्यतेने नियोजन विभागाकडे सादर करावा. यातील ज्या सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणे शक्य असेल, त्याला नियोजन विभागाने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा ह्या गावाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आधार नोंदणीसाठी पुढाकार घेऊन संपूर्ण नोंदणी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावात आरोग्य शिबिर आयोजित करून दुर्धर व असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्यांना उपचार देण्याची व्यवस्था करावी, जनधनअंतर्गत खाती उघडण्यासाठी प्रयत्न करावा, मातीचे नमूने तपासावेत, तसेच जिल्हा परिषदेने आपल्या प्रत्येक योजनेत या गावांना प्राधान्य क्रमाने घेऊन शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
आदर्श ग्रामसाठी सर्व विभागांचे योगदान
By admin | Published: August 17, 2016 1:17 AM