लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :
अर्धशतकाच्या दीर्घ कालावधीनंतर यवतमाळला दुसऱ्यांदा यजमानपद मिळाले आहे. महिला संमेलनाध्यक्ष, त्यातही बिनविरोध निवडलेल्या संमेलनाध्यक्ष हे या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे, संमेलनाच्या आदल्याच दिवशी उद्घाटकाचा मान एका आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला बहाल करून आयोजकांनी या सोहळ्याला ऐतिहासिक परिमाण मिळवून दिले आहे.येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत (समता मैदान) शुक्रवारी दुपारी ४ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, तर उद्घाटक म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा वैशाली सुधाकर येडे उपस्थित राहणार आहे. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री मदन येरावार, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची नावे आहेत. मात्र ते उद्घाटनाला उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती पालकमंत्री मदन येरावार यांनी दिली.अखिल भारतीय साहित्य महामंडळाने आपल्या घटनेत महत्त्वाचा बदल करून यावेळी इतिहासात पहिल्यांदाच साहित्य संमेलनाची निवडणूक न घेता बिनविरोध अध्यक्ष निवडला. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उद्घाटक म्हणून ख्यातकीर्त लेखिका नयनतार सहगल यांची निवड करून अत्यंत सुखद पाऊल उचलले होते. मात्र निमंत्रण पत्रिका वाटप केल्यानंतर सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याने मोठा वाद उफाळला. चोहोबाजूंनी टीका झाली. त्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी राजीनामा दिला. तर संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली.शेवटी संमेलनाच्या आदल्या दिवशी गुरुवारी यवतमाळात महामंडळाने बैठक घेऊन उद्घाटकाबाबत अंतिम निर्णय घेतला. तर तेथून दीड तासानंतर आयोजकांनी उद्घाटक म्हणून वैशाली सुधाकर येंडे यांचे नाव जाहीर केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात होत असलेल्या या संमेलनात उद्घाटक म्हणून एका शेतकरी महिलेलाच स्थान देण्यात आल्याने उद्घाटन सोहळ्यावारील वादाचे मळभ काहीसे दूर झालेले असले तरी ते पूर्णपणे पुसलेले नाही.उद्घाटनापूर्वी शहरातून निघणाऱ्या ग्रंथदिंडीत लेंगीनृत्य, कोलामीनृत्य, गोंडीनृत्याच्या माध्यमातून स्थानिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले जाणार आहे. तर ‘पुल’ आणि ‘गदिमां’च्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांचे जीवनदर्शनही घडविले जाणार आहे. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी १६०० कवितांचा समावेश असलेल्या कविकट्ट्याचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे करतील. त्यानंतर शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरात प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. लातूरचे फ. म. शहाजिंदे या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील.कोण आहेत वैशाली येडे?नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्य संमेलनाचे उद्घाटक कोण, हा प्रश्न निर्माण झाला होता. इतर तीन-चार साहित्यिकांच्या नावांचा आयोजकांचा प्रस्तावही महामंडळाने फेटाळला. त्यानंतर शेतकरी महिलेच्या हस्तेच उद्घाटन व्हावे, असा आग्रह यवतमाळच्या आयोजकांनी महामंडळाकडे धरला होता. त्यावर महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गुरुवारी निर्णय घेण्यात आला. तर संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी नव्या उद्घटकाच्या नावाची घोषणा केली. वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान देण्यात आला आहे. वैशाली येडे या कळंब तालुक्यातील राजूर या गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी कर्जापायी आत्महत्या केली. त्यांच्याकडे सध्या तीन एकर कोरडवाहू शेती आहे. तसेच गावातील अंगणवाडीत मदतनिस म्हणून त्या काम करतात. अपार कष्टाच्या बळावर त्या दोन मुलांची जबाबदारी सांभाळत आहेत. श्याम पेठकर लिखित आणि हरिष इथापे दिग्दर्शित ‘तेरवं’ या नाटकातही वैशाली येडे काम करतात. विशेष म्हणजे, हे नाटक वैशालीच्याच जीवनकहाणीवर आधारित आहे. एकल महिलांच्या हक्कांसाठीही ती झटत असते.संमेलनातील पहिल्या दिवसाचे कार्यक्रम (११ जानेवारी)- ग्रंथदिंडी : सकाळी ८ वाजता. आझाद मैदान ते संमेलनस्थळ.- ध्वजारोहण : सकाळी ९.३० वाजता. शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर. प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ.- ग्रंथप्रदर्शन उद्घाटन : सकाळी १०.१५ वाजता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी.- संमेलन उद्घाटन समारंभ : दुपारी ४ वाजता. शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर. प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ. (समता मैदान)- कविकट्टा उद्घाटन : सायंकाळी ७ वाजता. कवी शंकर बडे कविकट्टा परिसर. शिवा राऊत व्यासपीठ.- कविसंमेलन : सायंकाळी ७.३० वाजता. शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर. प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठ.