लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हज्जारो रुपये भरून चकाचक शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जी संधी आजवर मिळालेली नाही, ती संधी जिल्हा परिषदेच्या खेड्यापाड्यातील शाळांच्या चिमुकल्यांना मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोरगरिबांची मुले मान्यवर कवी म्हणून मानाचे स्थान पटकावणार आहेत. त्यांच्या बालमनातून प्रसवलेल्या कविता संमेलनाच्या दिमाखदार व्यासपीठावरून अवघ्या महाराष्ट्रातील दिग्गज सारस्वतांच्या काळजात जागा पटकावणार आहेत.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी खास पुढाकार घेतला असून रविवारी सुट्टी असतानाही शिक्षण सभापतींंनी या विषयावर आपल्या कक्षात बैठक घेतली. जवळपास २० शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते, तर तेवढ्याच संघटनांनी सभापतींच्या निर्णयाला फोनवरून होकार दर्शविला. संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.यवतमाळात ११, १२ आणि १३ जानेवारी रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. देशभरातील नामवंत मराठी साहित्यिकांची यावेळी मांदियाळी होणार आहे. याच महोत्सवात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा कविता संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी किशोर तळोकार या शिक्षकाला विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. २ हजारांपेक्षा अधिक शाळांमधून कविता गोळा करून त्यातील निवडक कवितांचा संग्रह करण्यात येणार आहे. तो संमेलनात पहिल्याच दिवशी प्रकाशित केला जाणार आहे. ४५ वर्षानंतर यवतमाळात होत असलेल्या अखिल भारतीय संमेलनात यानिमित्ताने वेगळा इतिहास रचला जाणार आहे.जिल्हा परिषदेचे सुमारे आठ हजार शिक्षक आहेत. साहित्य संमेलनाच्या तीन कोटींच्या खर्चात शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याला संघटनांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाय, संमेलनाच्या विविध समित्यांमध्ये शिक्षक समाविष्ट होऊन सक्रिय मदत करणार आहेत. या बैठकीला शिक्षण सभापती नंदिनी दरणे, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, दत्तराव दरणे, कार्यवाह प्रा. घनश्याम दरणे, पद्माकर मलकापुरे, प्रा. सारडे यांच्यासह शिक्षक संघटनांचे शरद घारोड, पुरुषोत्तम ठोकळ, गजानन पोयाम, सतपाल सोवळे, तुषार आत्राम, दिवाकर राऊत, दनकरराव बोधनकर, विलास राठोड, शशिकांत लोळगे, विनोद खरूळकर, विलास राठोड, झाकीर हुसैन, इनायत खान, संजय पवार आदी उपस्थित होते.संमेलनासाठी शाळा सकाळ पाळीतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचा सर्व चिमुकल्यांना आनंद घेता यावा, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळाही संमेलनकाळात सकाळ पाळीत घ्याव्या, अशी मागणी यावेळी शिक्षक संघटनांनी केली. शिक्षण सभापतींनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र शिक्षण समितीत ठराव झाल्यावरच त्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. संमेलन शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आहे. त्यामुळे केवळ एका दिवसासाठीच ठराव घ्यावा लागणार आहे.
खेड्यापाड्यातले बालकवी होणार अखिल भारतीय संमेलनाचे मान्यवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 9:55 PM
हज्जारो रुपये भरून चकाचक शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जी संधी आजवर मिळालेली नाही, ती संधी जिल्हा परिषदेच्या खेड्यापाड्यातील शाळांच्या चिमुकल्यांना मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोरगरिबांची मुले मान्यवर कवी म्हणून मानाचे स्थान पटकावणार आहेत.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा पुढाकार : शिक्षक संघटना संमेलनासाठी तन मन धनाने सज्ज