यवतमाळ : जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना बळीराजा चेतना अभियानातून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व बाधित तसेच उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांनासुध्दा ही मदत मिळणार आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त् जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, मुख्यमंत्री वैद्यकीस सहायता निधी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरवार उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेपेक्षा जास्त खर्च झाला असेल अशा रुग्णालयांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातर्फे मदत देण्यात येईल.
अडचणीत असलेल्या सर्व शेतक-यांच्या वैद्यकीय उपचारासाठी झालेला खर्चसुध्दा देण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. ज्या 131 आजारांवर केवळ शासकीय रुग्णालयात उपचार केले जातात अशा आजारांवर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची सुट देण्यात यावी. अशी सुचना पालकमंत्री मदन येरावार, मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात 108 क्रमांकाच्या 6 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून त्या करंजी (पांढरकवडा) प्राथमिक आरोग्य केंद्र, कोर्टा (उमरखेड), मेटीखेडा (कळंब), माथारजून (झरीजामणी), लोणी (आर्णि) आणि लोही (दारव्हा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आल्या आहेत. हृदयरोग असणा-या 0 ते 16 वयोगटातील रुग्ण, दोन्ही कान बधीर असलेले रुग्ण ज्यांना शस्त्रक्रियाद्वारे मोफत मशीन लावण्यात येईल असे रुग्ण आणि बोन मॅरो ट्रान्सप्लाँटची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल. यासंबंधित आजार असणा-या जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा तपास करून पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपचारासाठी मोफत पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी.धोटे, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बाबा येलके, डॉ.किशोर कोषटवार, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एम.ए. वारीस, विभागीय व्यवस्थापक डॉ. राहूल देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र इरपनवार, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मारू आदी उपस्थित होते.