लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खेड्या पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या २०० चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी यवतमाळात येऊन आपल्या अभिनय कौशल्याने शेकडो रसिकांना चकित केले. ‘शेतकरी व्यथा’ सादर करून कधी प्रेक्षकांना रडविले, ‘आईचे उपकार’ सांगत कधी भावुक केले, तर ‘गाव गाव गल्ली गल्ली’सारख्या विनोदी नाटिकेतून हास्याची कारंजी उडविली. ‘सखे तू साथ देशील’, ‘बेटी हिंदूस्थान की’, ‘चवदार तळ्याचे पाणी’ अशा नाटकांतून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सोमवारी येथील मेडिकलच्या जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात जिल्हास्तरीय बाल नाट्य महोत्सव पार पडला. उद्घाटनाला ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार चौधर, लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजीव खेरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप रावते उपस्थित होते. परीक्षक म्हणून हौशी नाट्यकलावंत अशोक आष्टीकर व ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. ललिता घोडे यावेळी मंचावर उपस्थित होते.नाट्य महोत्सव ही मुलांना मिळालेली विशेष संधी असून व्यावसायिक रंगभूमीवरील करियरच्या वाटा यानिमित्ताने ग्रामीण मुलांसाठी खुल्या होतील, असे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चौधर यांनी व्यक्त केले. यवतमाळात आयोजित बालनाट्य महोत्सव हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असून ही परंपरा पुढे चाललावी, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण मुलांना मिळालेले ही मोठी संधी असून इतरांनी केलेल्या टीकेचा विचार न करता मुलांनो, आपल्यातील कलागुणांना वाढवा, असा गुरुमंत्र राजेश कुलकर्णी यांनी दिला. यावेळी डॉ. दुर्योधन चव्हाण, दीपक चवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद देशपांडे यांनी केले, तर प्रणिता गाडवे यांनी आभार मानले.जिल्हाभरतील २०० बाल कलाकार या नाट्य महोत्सवात सहभागी झाले असून १८ नाटिका सादर केल्या. एरवी नाटकाला फारसे प्रेक्षक मिळत नसल्याची तक्रार असताना या नाट्य महोत्सवाला बाल रसिकांसह पालक, शिक्षक व रसिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.कापडी पिशव्यांनी स्वागतबालनाट्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर, परीक्षक व कलावंतांचे स्वागत कापडी पिशव्या देऊन करण्यात आले. सध्या राज्यात प्लास्टिकमुक्त अभियान सुरू असून त्याला बळ देणारे हे स्वागत असल्याने उपस्थितांनी या स्वागत पद्धतीचे कौतुक केले. तसेच नाट्य महोत्सवात ‘संडास नाही घरी आणि बायको गेली माहेरी’ हे व अशाच स्वरुपाच्या प्रबोधनपर कथा असणारी नाटकं जास्त संख्येत होती. त्यामुळे स्वच्छता अभियानात शिक्षण विभागाचा पुढाकार असल्याचा उल्लेख डॉ. पाटेकर यांनी प्रास्ताविकात केला.मार्गदर्शक कलावंतांचा गौरवज्येष्ठ नाट्यकर्मी अशोक आष्टीकर, डॉ ललिता घोडे यांच्यासह मुलांकडून तालीम करवून घेणारे नाट्य कलावंत अमित राऊत, मुन्ना गढवाल, श्रेयस गुल्हाणे, सतीश पवार, चैतन्य कांबळे, लखन सोनुले, शिल्पा बेगडे, प्रिती ठोंबरे, अशोक कार्लेकर, मंजुषा खर्चे, शिवानी नोमुलवार यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चिमुकल्यांच्या अभिनयाने सारेच मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 9:55 PM
खेड्या पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या २०० चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी यवतमाळात येऊन आपल्या अभिनय कौशल्याने शेकडो रसिकांना चकित केले. ‘शेतकरी व्यथा’ सादर करून कधी प्रेक्षकांना रडविले, ‘आईचे उपकार’ सांगत कधी भावुक केले, तर ‘गाव गाव गल्ली गल्ली’सारख्या विनोदी नाटिकेतून हास्याची कारंजी उडविली. ‘सखे तू साथ देशील’, ‘बेटी हिंदूस्थान की’, ‘चवदार तळ्याचे पाणी’ अशा नाटकांतून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा बाल नाट्य महोत्सव : शेतकऱ्यांची व्यथा, आईचे उपकार, चवदार तळ्याचे पाणी गाजले