लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत प्रचंड अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यातूनच शहर स्वच्छतेचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प होते. यासंदर्भात प्रशासनाकडून कुठल्याच हालचाली होत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुरुवारी पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले.शहरातील सफाई कंत्राटदाराने देयके थकल्यामुळे काम करणे बंद केले होते. परिणामी ठिकठिकाणी कचरा तुंबला. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने अखेर सत्ताधारी भाजपा, काँग्रेस, शिवसेना, बसपा नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिला. गुरुवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या वाहनतळात धरणे आंदोलन सुरू केले. आंदोलकांची बाजू ऐकून घेण्यासाठी आरोग्य सभापती जगदीश वाधवाणी, मुख्याधिकारी अनिल अढागळे येथे पोहोचले. यावेळी बांधकाम सभापती विजय खडसे, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, शिक्षण सभापती अॅड. करुणा तेलंग, दिनेश चिंडाले, नगरसेवक प्रा.डॉ. अनिल देशमुख, विशाल पावडे, संगीता कासार, अनिल धवने, गजानन इंगोले, नितीन बांगर, भोजने, अनिल यादव आदी उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी यासंदर्भात कक्षात बसून चर्चा करून असा प्रस्ताव नगरसेवकांपुढे ठेवला. त्यानंतर सर्व नगरसेवक मुख्याधिकाºयांच्या कक्षात पोहोचले. नंतर इतरही नगरसेवक कक्षात आले. काहींनी ठेकेदार कसा आर्थिक अडचणीत आहे, याची बाजू पुन्हा एकदा मांडली. तर आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी कंत्राटदाराचे आंदोलन बेकायदेशीर असून शहरातील स्वच्छतेचे काम तत्काळ सुरू झाले पाहिजे, अशी मागणी केली. अखेर एकाच कंत्राटदाराला १० ते ११ कामे दिल्याने त्याचे इतर कामांचे देयक अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सफाईच्या कंत्राटाचे देयक १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिले जाईल, असे सांगण्यात आले. सर्व नगरसेवकांसमोर दोन्ही कंत्राटदारांनी शुक्रवारपासून शहरातील सफाईचे काम पूर्ववत सुरू करण्याची हमी दिली. त्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.सर्व नगरसेवकांसमोर कंत्राटदाराला करारातील अटी, शर्ती दाखविण्यात आल्या. तांत्रिक बाबीमुळे त्याचे सात महिन्याचे एक कोटी रुपयांचे देयक बाकी आहे. मात्र लवकरच ते दिले जाईल. याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे कंत्राटदाराने काम बंद करण्यापूर्वी किमान आठ दिवसांपूर्वी सूचना द्यावी, अशीही तंबी त्याला दिली आहे.- जगदीश वाधवाणी, आरोग्य सभापती, नगरपरिषद, यवतमाळ
सर्वपक्षीय नगरसेवकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 9:50 PM
नगरपरिषदेत प्रचंड अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. यातूनच शहर स्वच्छतेचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प होते. यासंदर्भात प्रशासनाकडून कुठल्याच हालचाली होत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुरुवारी पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरू केले.
ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद : कंत्राटदाराशी वाटाघाटी, आरोग्य सभापतींची मध्यस्थी