लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे प्रतिष्ठान, गहुली येथील स्मारक, रहेमतनगर येथील शादीखाना ही तीनही प्रमुख बांधकामे अर्धवट आहेत. ही कामे त्वरित पूर्ण व्हावी, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (ए) कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपाचे नवनियुक्त आमदार अॅड. नीलय नाईक यांना साकडे घातले.तीनही बांधकामे अर्धवट स्थितीत असल्याने समाजात कशी नाराजी आहे, याची जाणीव रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर (दिग्रस) यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा नेते आमदार नाईक यांना करुन दिली. या कामांमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार असून त्याच्या चौकशीची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुसदच्या संभाजीनगरात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे भवन उभारले जात आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे ही वास्तू समाजोपयोगी ठरलेली नाही. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून पुसद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. त्यांनी निधी देण्यास तयारीही दर्शविली होती. मात्र स्थानिक राजकारण आडवे आल्याने निधी घेण्यास व सहकार्य करण्यास अनुकुलता दर्शविली गेली नाही. त्यामुळे ही वास्तू अपूर्ण असल्याचे कार्यकर्त्यांनी नीलय नाईक यांना सांगितले गेले.त्याच प्रमाणे हरितक्रांतीच प्रणेते वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुसद व त्यांचे मूळ गाव गहुली येथील स्मारकासाठी २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता देऊन एकरकमी १२ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र निविदा प्रक्रियेनंतर साडेतीन वर्षांपासून बांधकाम अपूर्ण असल्याने या वास्तूचे हस्तांतरण झाले नाही. पर्यायाने त्याचा समाजासाठी उपयोग होऊ शकलेला नाही. कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी केली असता अंदाजपत्रकात तरतूद असूनही संरक्षक भिंत, लिफ्ट दिसून आली नाही. बाहेरील लॉन, झाडे खराब झाले असून त्यावर गाजर गवत, तरोटा उगविल्याचे चित्र पहायला मिळाले. या वास्तू परिसराचा प्रातविधीसाठीही वापर केला जात असल्याचे सांगितले गेले.सुशोभीकरणासाठी वापरल्या गेलेल्या पेवर ब्लॉकचा दर्जा संशयास्पद आहे. ते ठिसूळ असून त्याला कलर नसल्याचे दिसून आले. मुख्य इमारतीच्या आजूबाजूची अनेक कामे बाकी आहेत. मुख्य दरवाजाजवळ चिखल आढळून आला. या इमारतीच्या आतील भागातसुद्धा बांधकामात अनेक उणीवा असण्याची शक्यता या कार्यकर्त्यांनी निलय नाईकांकडे बोलून दाखविली.उपरोक्त दोन प्रमुख कामांप्रमाणेच पुसदच्या रहेमतनगर येथील वसंतनगरच्या शेजारी असलेल्या शादीखाना इमारतीचे बांधकाम दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.मुस्लीम समाजातील गोरगरीबांना या शादीखानाच्या इमारतीची आवश्यकता आहे. मात्र इमारतच अपूर्ण असल्याने लग्न व सामाजिक कार्यासाठी इतरत्र धाव घ्यावी लागते. त्याचा मोठा आर्थिक बोझाही सहन करावा लागतो. तरी जातीने लक्ष देऊन उपरोक्त तीनही सामाजिक आवश्यकतेची कामे तातडीने पूर्ण करून घ्यावी, अशी मागणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे आमदार अॅडनीलय नाईक यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, गौतम रणवीर, प्रकाश खंडागळे, अनिल जाधव, समाधान आडे, सीताराम चव्हाण, सुनील राठोड, रवी राठोड, रोशन जमीर, मो.सोहील, अमजद खान, तमीजोद्दीन मो. अफसर आदींच्या स्वाक्षºया आहेत.
आंबेडकर भवन, नाईक प्रतिष्ठान, शादीखानाचे बांधकाम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:15 PM
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे प्रतिष्ठान, गहुली येथील स्मारक, रहेमतनगर येथील शादीखाना ही तीनही प्रमुख बांधकामे अर्धवट आहेत.
ठळक मुद्देपुसद तालुका : आमदार नीलय नाईकांना रिपाइंचे साकडे