यवतमाळ : गुटखा तस्करीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यामधून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. त्यामुळे अनेकांनी या अवैध व्यवसायात पैसा गुंतवला आहे. यातून मिळणारा काळा पैसा पांढरा करणारा वर्गही वेगळाच आहे. दरम्यान, तस्करीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे. आर्णी येथून यवतमाळात गुटखा घेऊन येणारी रुग्णवाहिका ग्रामीण पोलिसांनी आर्णी रोडवर तपासली. तेव्हा हे वास्तव बाहेर आले.
आर्णी येथून एमएच-२९ - टी-३२५६ क्रमांकाची रुग्णवाहिका यवतमाळकडे निघाली. शहरालगतच्या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आर्णी मार्गावर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीवरून ही रुग्णवाहिका थांबविली. मंगळवारी रात्री या रुग्णवाहिकेची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये सीटच्या खाली गुटख्याची तीन पोती दडविलेली आढळून आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतील प्रदीप थावरा राठोड (२७), सय्यद रहेमान सय्यद उमर (२४), रुग्णवाहिकेचा चालक अनिल डुड्डेकर (२३) (तिघे रा. अमराईपुरा आर्णी) यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी अन्न निरीक्षक घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यातील २६ (२), २७, ३० (२) (ए) ५९ या कलमानुसार ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात जमादार कैलास लोथे, संदीप मेहेत्रे, रुपेश नेवारे, विक्की राऊत, जांभुळकर आदींनी केली.
आर्णी गुटख्याचे बनले केंद्र
लगतच्या तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित गुटखा आणला जातो. आर्णीत गुटखा साठविण्याचे मोठे गोदाम आहे. २१ नोव्हेंबरला पारवा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने १० लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील सलीम शेख गफूर, महेबूब शेख सादीक हे दोघे पसार झाले होते. आर्णीतूनच यवतमाळ, अमरावती, वाशिम, नागपूर या ठिकाणी गुटखा पाठविला जातो. विशेष करून किराणा मालाच्या आडून गुटख्याची तस्करी करण्यात येते. हे मोठे रॅकेट अजूनही पोलिसांना उघड करता आले नाही. या व्यवसायातील व्हाईट कॉलर गुन्हेगार पोलीस कारवाईपासून दूर आहेत.