पीएचसीमधून गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले जाते. त्याकरिता तेथे रुग्णवाहिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका १० ते १२ वर्ष पूर्वीच्या असल्याने नादुरुस्त व बंद आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा यशवंत पवार यांनी तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती. आता त्यांच्या प्रयत्नामुळे प्राधान्याने दुर्गम भागातील व नवीन निर्माण झालेल्या १६ आरोग्य केंद्रांना जिल्हा खनिकर्म विकास प्रतिष्ठानअंतर्गत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी निधी मंजूर केला. त्यामुळे लवकरच १६ रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.
अध्यक्ष कालिंदा पवार यांनी जिल्ह्यातील उर्वरित ३२ आरोग्य केंद्रांकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर जिल्हा परिषदेकडून सादर प्रस्तावानुसार महाराष्ट्र शासनाच्या एसडीआरएफ निधीतून २० रुग्णवाहिका, राज्य शासनाच्या राज्य निधीतून १० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून त्याकरिता लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.