रोजगार हमी योजनेअंतर्गत वांजरी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या राजू रामलू गुडेवार यांच्या शेतातील विहीर बुजलेली होती. खचलेली व बुजलेली विहीर रोहयोतून दुरूस्तीकरण करण्याकरिता ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. सन २०१८-१९ मध्ये राजू गुडेवार यांच्या शेतातील खचलेली व बुजलेली विहीर दुरूस्तीकरण करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे व देयकसुद्धा उचलण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र राजू गुडेवार यांची खचलेली व बुजलेली विहीर दुरूस्तीच करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून राजू गुडेवार हे विहीर दुरूस्त करून द्यावी, यासाठी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत. अधिकारी त्यांना आज करू, उद्या करू, असे म्हणून त्यांची दिशाभूल करीत आहेत. गावातील राजकीय ठेकेदाराने त्यांची रक्कम लंपास केली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीचे तत्कालीन पदाधिकारी तथा ग्रामसेवकांचासुद्धा समावेश असल्याची माहिती महादेव गुडेवार यांना माहीत होताच त्यांनी आपली तक्रार महापोर्टलवर प्राप्त होताच गटविकास अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सचिवास पुढील कार्यवाही करण्याकरिता मोजमाप पुस्तिका व फाईल पंचायत समितीमध्ये सादर करण्याकरीता पत्र दिले. परंतु अजूनपर्यंत मोजपुस्तिका व फाईल पंचायत समिती कार्यालयात सादर केलेली नाही. अजून गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी महादेव गुडेवार यांनी केली आहे.
विहिरीचे दुरूस्तीकरण न करताच उचलली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:44 AM