लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ सत्ताधारी भाजपातील नेत्यांच्या पाठबळावर टिकून आहे. त्यातच आता बँकेच्या नोकरभरतीत अमरावतीच्या एजंसीने मोठी ‘उलाढाल’ व त्याआड गैरप्रकार केल्याची ओरड ऐकायला येत आहे. ते पाहता या एजंसीला बँकेच्या संचालक मंडळातीलच कुणाचे तरी मोठे पाठबळ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा बँकेचे संचालक मंडळ सुमारे १२ वर्षांपासून कायम आहे. एकीकडे आम्ही निवडणुका घ्या, अशी मागणी स्वत:च करीत असल्याचे संचालक सांगतात. तर दुसरीकडे भाजप-सेनेने प्रशासक बसवू नये म्हणून तमाम संचालक भाजप नेत्यांच्या आश्रयाला गेले. त्यातूनच अवघ्या एका सदस्याच्या बळावर बँकेची सत्तासूत्रे भाजपच्या हाती दिली. आता संपूर्ण बँकेचा कारभारच भाजप नेत्याच्या इशाऱ्यावर चालविला जात असल्याची धुसफूस संचालकांमधूनच ऐकायला येते. जिल्हा बँकेने लिपिक व शिपायाच्या १४७ जागांसाठी नुकतीच भरतीप्रक्रिया राबविली. यात मोठ्या प्रमाणात घोळ घातला गेला. भाजप नेत्याच्या नावावरच दहा ते पंधरा उमेदवार नोंदविले गेल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय प्रमुख कर्त्या-धर्त्यांच्या नावावरील प्रत्येकी चार ते पाचच्या नोेंदी वेगळ्याच. कोट्यातील या तफावतीमुळेच नोकरभरतीवर संशय निर्माण झाला आहे. त्यातही भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या अमरावतीच्या एजंसीभोवती संशयाचे वलय निर्माण झाले. ‘बँकेच्या संचालकांना सत्ताधारी भाजप नेत्याचे पाठबळ व आता या संचालकांचे अमरावतीच्या एजंसीला पाठबळ’ असे हे नोकरभरतीतील भ्रष्टाचाराचे सूत्र असल्याचे सांगितले जाते. वरपर्यंत तक्रारी करणाऱ्यांचे ‘रिमोट’ आपल्या हाती ठेवणाऱ्या एका ‘अनुभवी’ संचालकाला ‘खूश’ करण्यात नोकरभरतीचे कर्ते-धर्ते यशस्वी झाल्याचेही सांगितले जाते.अंतिम निवड यादी लागण्यापूर्वीच कोर्ट-कचेरीत अडकलेली ही भरती प्रत्यक्ष यादी जाहीर झाल्यानंतर कोर्ट-कचेरीच्या आणखी खोलात अडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. बँकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या अमरावती विभागीय व पुण्याच्या सहकार प्रशासनाकडेही भरतीतील उमेदवारांकडून साशंकतेने पाहिले जात आहे.भाजपमधील सत्ताधारी नेत्याच्या पाठबळावर ही भरती आचारसंहितेत अडकू नये, त्यापूर्वी ‘हिशेब’ व्हावा यासाठी संचालक मंडळातील कर्ते-धर्ते धडपडत असल्याची माहिती आहे.मंत्री, खासदार, आमदार गप्प का ?जिल्हा बँकेच्या नोकरभरतीतील गैरप्रकाराची प्रचंड ओरड सुरू आहे. भरती कोर्ट-कचेरीत अडकली आहे. या भरतीमुळे शेकडो शेतकरी पुत्रांचा जीव टांगणीला लागला आहे. परंतु त्यानंतरही जिल्ह्यातील कुणीच मंत्री, खासदार, आमदार या भरतीबाबत ब्रसुद्धा काढण्यास तयार नाही. संचालक ‘कोटा’पद्धतीमुळे गप्प आहेत, इतरांच्या गप्प राहण्यामागील ‘रहस्य’ मात्र गुलदस्त्यात आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरभरतीत अमरावतीची एजंसी संशयाच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 9:57 PM
‘बँकेच्या संचालकांना सत्ताधारी भाजप नेत्याचे पाठबळ व आता या संचालकांचे अमरावतीच्या एजंसीला पाठबळ’ असे हे नोकरभरतीतील भ्रष्टाचाराचे सूत्र असल्याचे सांगितले जाते. वरपर्यंत तक्रारी करणाऱ्यांचे ‘रिमोट’ आपल्या हाती ठेवणाऱ्या एका ‘अनुभवी’ संचालकाला ‘खूश’ करण्यात नोकरभरतीचे कर्ते-धर्ते यशस्वी झाल्याचेही सांगितले जाते.
ठळक मुद्देसंडे अँकर । गैरप्रकाराची ओरड, एजंसीला संचालकांचे तर भाजप नेत्याचे बँकेला पाठबळ