रुपेश उत्तरवार
यवतमाळ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिल्ली येथे साकारल्या जाणाऱ्या अमृत वाटीकेसाठी माती पाठविण्यात येत असून यवतमाळ नगरपरिषदेचे शहरात ठिकठिकाणाहून जमा केलेल्या मातीचा कलश आज जिल्हा प्रशासनाच्या स्वाधिन केला.
यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी कलश सुपुर्द करतांना उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून अमृत वाटीका साकारली जात आहे. त्यासाठी देशभरातून माती जमा केली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडलेला एक युवक ही माती दिल्लीत घेऊन जाईल. जिल्ह्यातून माती नेण्यासाठी युवकाची निवड करण्यात आली आहे.
दिल्लीत साकार होत असलेल्या अमृतवाटीकेत एकरुप होण्यासाठी यवतमाळ नगर परिषदेने शहरातील विविध प्रभागातील माती एकत्रित करुन तयार केलेला शहरस्तरीय मातीचा कलश कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांच्या कक्षात त्यांचा सुपुर्द केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका प्रशासन विभागात हा कलश जिल्हा प्रशासन अधिकारी यांनाकडे सुपुर्द करण्यात आला.
‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानांतर्गत मिट्टी का कलश हा उपक्रम राबवतांना यवतमाळ नगरपरिषदेने शहरातील २८ प्रभागातील माती गोळा करुन एक शहरस्तरीय कलश तयार केला. आता हा कलश देशभरातुन गोळा होणाऱ्या ७ हजार ५०० कलशात सम्मिलीत होणार आहे. दिल्लीतील नियोजित अमृतवाटीकेत उपयोग केल्या जाणाऱ्या मातीत एकरुप होण्याकरीता हा कलश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिल्ली येथे पोहोचविला जाणार आहे.