यवतमाळ : घरासमोरच्या ओट्यावर का बसू दिले नाही, यावरून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. हे प्रकरण आपसी समझोत्याने मिटविण्यात आले. त्यानंतर गाफील असलेल्या कुटुंबावर सहा जणांच्या सशस्त्र टोळीने गुरुवारी रात्री एक वाजता हल्ला चढविला. यात काका-पुतण्या हल्लेखोरांच्या तावडीत सापडले. एक जण जीव वाचविण्यात यशस्वी ठरला. हल्लेखाेरांनी काका-पुतण्याला कोयता व चाकूचे सपासप वार करून जागेवरच ठार केले. ही घटना पुसद शहरातील विटाळा वार्डमध्ये घडली. भयभीत झालेले केवटे कुटुंब घरातून हा थरार पाहत होते.
पुसद शहरातील विटाळा वार्ड ही वस्ती श्रमिकांची आहे. रोजमजुरी करून उदरनिर्वाह करणारे येथे राहतात. केवटे कुटुंबीयांचाही परिवार याच ठिकाणी आहे. रात्री जेवण झाल्यानंतर घरासमोरच्या ओट्यावर कुटुंबातील सदस्य बसून असतात. बुधवारी रात्री १०:३० वाजता असेच केवटे कुटुंबीय घराबाहेर असताना आरोपी गणेश तोरकड व अवि चव्हाण हे दोघे तेथे पोहोचले. ओट्यावर बसण्यावरून त्यांनी वाद घातला. नयन अनिल केवटे याच्याशी त्यांनी वाद घातला. हे पाहून बाजूला बसून असलेले राहुल केवटे, बंटी केवटे, क्रिश केवटे यांनी मध्यस्थी केली. आरोपींना धाकदडप करून तेथून हुसकावून लावले. पुतण्यालाही घरात पाठवून दिले.
येथेच हे भांडण मिटले असे समजून केवटे कुटुंबीय शांत झाले होते. मात्र, तीन तासानंतर रात्री एक वाजता गणेश संतोष तोरकड (२१), अवि चव्हाण (२२), पवन बाजीराव वाळके (२३), नीलेश दीपक थोरात (२४), गोपाल शंकर कापसे (२६), गणेश शंकर कापसे (२८) हे कोयता व चाकू असे शस्त्र घेऊन केवटे यांच्या घरासमोर पोहोचले. तेथे राहुल हरिदास केवटे (४५), बंटी हरिदास केवटे (४३) व क्रिश विलास केवटे (२०) हे तिघे बसून होते. शस्त्र घेऊन आलेल्या आरोपींनी थेट तिघांवरही हल्ला चढविला. हल्लेखोरांच्या तावडीतून बंटी केवटे बाहेर पडण्यास यशस्वी झाला. त्याच्या पाठीवर कोयत्याचा वार बसला.
जिवाच्या आकांताने तिघेही जण आरडाओरडा करू लागले. घरात झोपलेले केवटे कुटुंबीय खडबडून जागे झाले. सशस्त्र हल्लेखोर घरावरही चालून येण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे दोघांना डोळ्यादेखत रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पाहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना जागे केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
राहुल केवटे, क्रिश केवटे व बंटी केवटे या तिघांना परिसरातीलच ऑटोरिक्षातून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. उपजिल्हा रुग्णालयात राहुल व क्रिश या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पाठीवर, छातीवर, पोटावर गंभीर जखमा होत्या. जखमी बंटी केवटे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
घटनेनंतर विटाळा वार्डमध्ये तणाव
बुधवारी रात्री घडलेल्या गंभीर घटनेनंतर विटाळा वार्ड परिसरात तणावाची स्थिती आहे. या ठिकाणी पुसद शहर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अलुरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबीचे प्रमुख आधारसिंग सोनोने यांनी भेट दिली. पुसद ठाणेदार उमेश बेसरकर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अटक केलेल्या आरोपींवर पुर्वीचे गुन्हे असल्याने ठोस प्रतिकाबंधक कारवाई प्रस्तावित होवू शकते.
नगर येथून आरोपींना घेतले ताब्यात
पुसद येथे काका-पुतण्याची हत्या केल्यानंतर 'हल्लेखोर चारचाकी वाहनाने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. ते नगर जवळ असल्याची माहिती मिळाली. त्यावरून नगर पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करीत आरोपींना ताब्यात घेतले. पुसद शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ही कारवाई केली आहे. या आरोपींना पुसदमध्ये आणण्यात येत आहे.
घरासमोर रक्ताचा सडा
केवटे यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी कुटुंबातील तिघांवर धारदार शस्त्राने वार केले. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. हे दृश्य अंगावर शहारे 'उभे करणारे होते. काय कसे करावे हे कुणालाच सूचत नव्हते, गुरुवारी सकाळी पाणी टाकून परिसर स्वच्छ करण्यात आला.
काही तासातच तिसया हत्येमुळे शहरात खळबळ...
पुसद शहरालगत कवडीपूर येथील महात्मा फुले चौकात गुरुवारी रात्री ९:३० वाजता चौघांनी एका युवकाचा चाकूने भोसकून खून केला, यातील मृतावर काही महिन्यांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पुसद शहरात २४ तासात खुनाची ही तिसरी घटना आहे. विटाळा वॉर्डमध्ये काका-पुतण्याची हत्या झाली. त्याचा तपास सुरू असतानाच वसंतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली. संघदीप भगत (रा. कवडीपूर) असे मृताचे नाव आहे. तो जागेवरच गतप्राण झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वसंतनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. २४ तासात सलग तीन खून झाल्याने पुसद परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील खुनाची मालिका सुरु आहे. यवतमाळनंतर आता पुसद परिसर गाजतोय.