यवतमाळ : शहरात चोरट्यांची दहशत कायम आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिस ठाणे स्तरावरही या चोरट्यांना पकडण्यात कुणालाच यश आलेले नाही. सातत्याने मोठमोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. रेणुका मंगल कार्यालय परिसरात अरुणोदय सोसायटीमध्ये चोरट्याने व्यापाऱ्याचे बंद घर फोडून मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सात लाख रुपये रोख व २० लाखांचे सोने असा २७ लाखांचा ऐवज लंपास केला.
हिरालाल गयाप्रसाद जयस्वाल असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा भाजी विक्रीसह इतरही मोठा व्यवसाय आहे. जयस्वाल कुटुंबीय बाहेरगावी गेले आहे. चोरट्यांनी त्यांच्या घरात ग्रील तोडून प्रवेश केला. रविवारी सकाळी घराचे दार उघडे दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. याची माहिती त्यांनी जयस्वाल यांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवधूतवाडी पोलिस या ठिकाणी पोहोचले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. घरातून मोठा ऐवज चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. चोरट्यांनी घरातील कपाट, तिजोरी फोडली. त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. आरोपीचा माग काढता येईल या आशेने पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले; मात्र दोघांनाही काही ठोस हाती लागले नाही. श्वान याच परिसरात घुटमळत राहिले. रेकॉर्डवरच्या चोरट्यांचा शोध घेतला जात नाही. एक-दोन कारवाया करून नंतर पाठपुरावा होत नाही. यामुळे बहुतांश चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले नाही.
मटका, जुगारात पोलीस भागिदार, बेरोजगारी चोरीला ठरतेय पूरकमटका, जुगार हे अवैध धंदे वरिष्ठांनी बंद ठेवण्यास सांगितले. प्रत्यक्षात मात्र या धंद्यात भागिदार असणारे पोलीस शिपाईच वरिष्ठांच्या पथकात कार्यरत आहे. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. पूर्वसूचना देवून मुख्य हस्तकांना सुरक्षित केले जाते. ठाणेस्तरावर या अवैध व्यवसायातून महिन्याकाठी पैसा मिळतो.मटका, जुगार आणि कुंटणखाने चोरीचे गुन्हे वाढविण्यासाठी पूरक ठरत आहे. बेरोजगार युवक स्वत:चे व्यसन व शाैक पूर्ण करण्यासाठी चोरीत गुंतलेले आहे.
चोरीचा घटनाक्रम झाला सीसीटीव्हीमध्ये कैदचोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पुरेपूर खबरदारी घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. या फुटेजमध्ये एक व्यक्ती पूर्ण चेहरा झाकलेला इतकेच नव्हेतर हातात हॅन्डग्लोज घालून जयस्वाल यांच्या घरात शिरताना दिसते. समोरचे दार उघडता आले नाही. त्यामुळे त्यांनी घरामागे जाऊन वॉश एरियाची ग्रील तोडली व प्रवेश मिळवला. नंतर घरातील साहित्याची फेकाफेक करून माैल्यवान ऐवज शोधला व ते मुख्य प्रवेश दारातून बाहेर पडले. तब्बल तीन तासाचा घटनाक्रम असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते.
पोलिसांची रात्रग्रस्त संशयास्पदरात्रगस्तीचे पोलीस केवळ प्रमुख मार्गानेच फिरतात. खऱ्याअर्थाने चोरटे वसाहतींमध्ये आपल्या कारवाया करताना दिसत आहेत. मात्र या भागात पोलीस गस्त पोहोचत नाही. गस्तीच्या मार्गाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस बाहेर, चोरटे आत अशी स्थिती सध्या शहरात आहे.