यवतमाळ : गुरुवारी दुपारी उमरखेड तालुक्यातील माळआसोली शिवारात सोयाबीनच्या कुटारामध्ये जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. शारीरिक संबंधास विरोध करीत असल्याने संंतापलेल्या पतीनेच दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सोयाबीनच्या कुटारामध्ये घेऊन मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार तपासातून पुढे आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
उमरखेड तालुक्यातील माळआसोली शिवारातील एका शेतात सोयाबीनच्या कुटारामध्ये जळालेल्या अवस्थेत गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास मृतदेह आढळला होता. घटनेनंतर उमरखेडचे उपविभागीय पोलिस अधीक्षक प्रदीप पाडवी, पोफाळीचे ठाणेदार राजीव हाके, बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. प्रेताची पाहणी केली असता प्रेताच्या हातात बांगड्या दिसून आल्याने हे प्रेत महिलेचेच असल्याचे निष्पन्न झाले.
तपास सुरू केल्यानंतर शेताशेजारीच राहणाऱ्या संजय साखरे याची पत्नी मायाबाई ही सकाळपासून गायब असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संजय साखरे याला संशयावरून ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणून त्याची सखोल विचारपूस सुरू केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पती संजय विरोधात कलम ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह बिटरगावचे सपोनि सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित, गणेश राठोड, किसन राठोड, प्रकाश बोंबले, राम गडदे, रुपेश चव्हाण, संदीप ठाकूर, नितीन खवडे, मुन्ना आडे, परशुराम इंगोले आदींनी केली.
तिने नकार देताच संतापलेल्या पतीने आवळला गळामायाबाई व संजय साखरे यांच्यात मागील अनेक दिवसांपासून शारीरिक संबंध नव्हते. गुरुवारी दुपारी ही हे दोघे शेतात काम करीत होते. शेतात कुणीही नसल्याने पती संजयने पत्नीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र माया हिने त्यास नकार दिला. पत्नी नेहमीच शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध करीत असल्याने संतापलेल्या पतीने नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगडाने तिच्यावर वार केले. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र आरोपीची पाचावर धारण बसली. घाबरलेल्या संजयने मयत पत्नीचे प्रेत शेजारच्या शेतातील सोयाबीनचे कुटाराकडे नेले व कुटारात टाकून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.