दिग्रसचा तरुण : छंदातून जपला वारसा, २० हजार वस्तूंचा संग्रहसुनील हिरास दिग्रसप्रत्येकालाच कशा ना कशाचा छंद असतो. परंतु हा छंद वयोमानानुसार मागे पडत जातो. दिग्रसच्या एका तरुणाला जडलेला प्राचीन वस्तू संग्रहाचा छंद गतवैभवाची साक्ष देते. आज त्याच्या संग्रहात तब्बल २० हजार विविध वस्तू असून पाहणाराही थक्क होवून जातो. मनोज सरवैया असे या संग्रहक तरुणाचे नाव असून तो औषधी विक्रीचा व्यवसाय करतो. सामाजिक, सांस्कृतिक भान असलेल्या या तरुणाने तब्बल २० हजार दुर्मिळ व प्राचीन वस्तूंचा संग्रह घरी केला आहे. अत्यंत जुने नक्षीदार पक्षी, पानदान, अडकित्ते, मूर्ती, भांडी, खलबत्ते, बैलांचे साज, चाळण्या, जुने अवजार, हत्त्यार, हळदी-कुंकवांचे करंडे, सुरमादानी, अत्तरदानी, दौत, कुलूप-किल्ल्या, चुनाळू, जुने घड्याळ, शृंगार पेटी, पूजेचे ताट, लाकडी मूर्ती, फूलदानी, बैलांच्या शिंगापासून तयार केलेल्या वस्तू एवढेच नाही तर सूत कातण्याच्या चरखा, अगरबत्ती स्टॅन्ड आदींचा समावेश आहे.त्याच्या या संग्रहात तलवारी, जहाज, समई, किटली, लाईट, कप, गुलदस्ते, शिवणयंत्र आणि धातूच्या कोरिव मूर्त्या आहे. पाहणाऱ्याला गतवैभवात घेऊन जाणाऱ्या या संग्रहात दुर्मिळ नाणी आहे. तीन ते चार हजार नाण्यांच्या या संग्रहात राजे-महाराजांच्या काळातील उर्दू, फारशी, मोडी लिपी कोरलेले नाणे आहे. जुने व दुर्मिळ टपाल तिकीटही त्याच्या या संग्रहात दिसून येतात. असा हा खजाना तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावा म्हणून तो दरवर्षी शाळा, महाविद्यालयात प्रदर्शन लावतो. आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती देतो. या छंदासाठी आपल्याला भरपूर वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. अनेकदा यातील काही वस्तू मोठ्या किमतीत मागितल्या. परंतु आपण कोणतीही वस्तू विकत नाही. आपला छंद असून या छंदासाठी पैसे कितीही गेले तरी चालतील, असे तो सांगतो.
मनोजच्या संग्रहात प्राचीन वैभव
By admin | Published: January 28, 2017 2:26 AM